शंभर वर्षांपूर्वी हिराबाई बडोदेकर जाहीरपणे गायल्या, त्याआधी म. फुले यांनी स्त्रीशिक्षणाला चालना दिली.. पण स्त्रियांच्या हक्कांसाठी समाजाने मिळून किती प्रयत्न केले?
कायदे असून उपयोग नसतो, प्रथा-परंपरांची कालबाता ओळखून त्या सोडायच्या तर सर्वाची साथ हवी, हा धडा हेरवाड गावाने घालून दिला..
पतिनिधनाने विवश झालेल्या स्त्रीचे नंतरचे जगणे सुस नसते, याचा प्रत्यय आजही समाजाच्या अनेक क्षेत्रांत येताना दिसतो. तिला पती असताना मिळणारे स्वातंत्र्य आपोआप हिरावून घेतले जाते आणि जगण्याची इच्छाच राहू नये, असे वर्तन समाजातील अन्य घटकांकडून होत राहाते. कायदे करून विधवांना सन्मानाने वागणूक देण्यासाठी प्रयत्न करूनही त्यात ग्रामीण भागांत फारशी प्रगती झालेली दिसत नाही. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यतील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवांना सन्मानाने वागणूक देण्याबाबत अलीकडे घेतलेला पुढाकार महत्त्वाचा ठरतो. मध्ययुगातील अतिशय मागास वाटाव्या अशा प्रथांनी ग्रस्त झालेल्या विधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, हे फारच अवघड काम मागील शतकात महात्मा जोतिबा फुले यांनी हाती घेतले. त्यानंतर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनीही ते प्रयत्नपूर्वक पुढे सुरू ठेवले. तरीही पुरुषाच्या निधनानंतर पत्नीच्या बांगडय़ा फोडणे, कपाळीचा कुंकवाचा टिळा पुसणे यांसारख्या प्रकारांना समाजमान्यता मिळतच राहाते. हे प्रयत्न सामूहिक पातळीवर होणे आवश्यक असल्याने हेरवाड ग्रामपंचायतीचे अभिनंदन करायला हवे. महाराष्ट्र शासनानेही हाच आदर्श राज्यभर गिरवण्याचे ठरवल्याने एकविसाव्या शतकाच्या मध्याकडे झेपावतानाही समोर त्याच आव्हानांचा डोंगर उभा असल्याचे लक्षात येते.
पतीचे निधन झालेल्या स्त्रीला ‘विधवा’ म्हणू नये, असे न्यायालयाने याआधीच बजावून झाले. घटस्फोट झाल्याने किंवा पती घर सोडून गेल्याने स्त्रीला वैधव्य प्राप्त होत नाही. तरीही तिचे जगणे तेवढेच खडतर राहाते. स्त्रियांना शिकवण्याचे महत्त्व समजल्याने महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या शाळेस झालेला विरोध मोडून काढण्यासाठी त्यांनी बळाचा वापर केला नाही. त्यांनी एका परित्यक्तेच्या मुलाला दत्तक घेऊन जी अभिजातता दाखवली, ती त्यांच्या वैचारिक उंचीचे दर्शन घडवणारी होती. पतीच्या निधनानंतर त्याच्या चितेवर उडी मारून स्वत:ला जाळून घेण्याची सक्ती करणारी सती ही प्रथा क्रूरता आणि निर्घृणता यांचे प्रतीक होती. ही प्रथा बंद करण्यासाठी बंगालमधील विचारवंत आणि समाजधुरीण राजा राममोहन रॉय यांनी आंदोलनाला सुरुवात केली. तेव्हा भारतात ब्रिटिशांचे राज्य असल्याने कोलकात्यातील या आंदोलनाला सरकारने सहिष्णुतेने उत्तर देण्यासाठी सतीची प्रथा बंद करणारा कायदाच केला. तरीही प्रश्न पूर्णत्वाने सुटण्याची शक्यता नव्हतीच. याचे कारण लहानपणीच विधवा झालेल्या मुलीस तिचे पुढील सारे आयुष्य आसपासच्या पुरुषांच्या वखवखलेल्या नजरांच्या तुरुंगात राहूनच व्यतीत करावे लागत होते. महात्मा फुले यांनी त्यासाठी स्त्रीला शिकवण्याचा मार्ग निवडला. त्याने मात्र हळूहळू मोठाच परिणाम झाला. तरीही ग्रामीण भागातील महिलांना शहरांतील महिलांच्या तुलनेने स्वातंत्र्याचा पूर्ण स्पर्श झालेला नाही, याचा प्रत्यय आजही येताना दिसतो.
हेरवाड या गावात चर्मकार समाजातील एका व्यक्तीचे निधन झाल्यानंतर सरपंच सुरगोंडा पाटील यांनी त्या घरी जाऊन सांत्वन करतानाच पत्नीला विधवा प्रथांपासून दूर ठेवण्याची विनंती केली. त्या समाजातील नेत्यांनीही त्यास दुजोरा दिला आणि संपूर्ण गावानेच विधवा प्रथांना बंदी घालण्याचा निर्णय घेतला. शहरांमधील कुणाला या घटनेचे अप्रूप नसेल, तरी या देशाचे ग्रामीण वास्तव आजही तेवढेच करपलेले आहे, ही वस्तुस्थिती या निमित्ताने पुढे आली. बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या ‘दर्पण’ या नियतकालिकात लोकहितवादी या महाराष्ट्रातील विचारवंताने लिहिले होते, ‘जोपर्यंत आह्मी आपल्या देशात बायकांस शहाण्या करणार नाही, तोपर्यंत आह्मी मूर्ख राहू. कारण की, बायकांचे हाती प्रथम मुलांस रीतभात लावणे आहे.’ हा विचार त्या काळातील सामाजिक परिस्थितीत क्रांतिकारीच होता.
लोकसंख्येच्या सुमारे ५० टक्के असलेल्या महिलांना पुरेशी प्रतिष्ठा मिळू नये, हा पुरुषी कावा मध्ययुगात जन्माला आला. पुरुष या जमातीने आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी स्त्रीला गुलाम करण्याची कल्पना प्रत्यक्षात आणली आणि त्याने संपूर्ण समाजाचे चित्रच पालटून
गेले. पैसा मिळवण्याची जबाबदारी पुरुषाने स्वीकारली आणि घर चालवण्याची, सांभाळण्याची जबाबदारी स्त्रियांवर ढकलून दिली. त्यास त्या वेळी विरोध न झाल्याने नंतरचा सगळा काळ स्त्रियांसाठी अंधारकोठडीचा ठरला. परिणामी भ्रूणहत्या, स्त्रीशिक्षण, बालविवाह, जरठ-बाला विवाह, केशवपन, विधवा विवाहबंदी यांसारख्या पुरुषी अहंकारातून निर्माण झालेल्या कल्पनांची शिकार होण्यावाचून स्त्रीला गत्यंतरच उरले नाही. पतिनिधनानंतर केशवपन करून लाल रंगाच्या अलवणीत गुंडाळून घेत करपलेल्या भविष्याला सामोऱ्या जाणाऱ्या स्त्रियांना उजेडाची तिरीप मिळाली, ती फुले आणि कर्वे यांच्या कार्यामुळे. पुण्याजवळच्या हिंगणे गावी कर्वेनी सुरू केलेल्या अनाथ बालिकाश्रमात आणि नंतर स्थापन केलेल्या हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेमुळे विधवा आणि परित्यक्तांना जगण्याची नवी संधी मिळण्याची सोय झाली. परंतु तोवर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते.
सामाजिक बदलांना चालना मिळण्यासाठी कलांच्या क्षेत्रातील बदल अधिक उपयोगी ठरतात. महिलांच्या अधिकारांबाबतही बहुधा असेच घडले असणार. महात्मा फुले यांनी मुलींची शाळा सुरू केली, तरी त्याचा प्रत्यक्ष परिणाम दिसायला काही दशकांचा कालावधी जावा लागला. १८८० मध्ये सुरू झालेल्या मराठी संगीत नाटकांमध्ये स्त्री भूमिका करण्याचे काम पुरुषांवर जाणीवपूर्वक सोपवले गेले. एवढेच काय या नाटकांना स्त्रियांना स्वतंत्रपणे बसण्यासाठी सोय केली जात असे. आपल्या प्राचीन साहित्यातही स्वर्ग या कल्पनेत स्त्रीला नर्तिकेचे काम दिले आहे. स्त्रीचा आवाज आजन्म सुरेल राहू शकतो आणि पुरुषाचा आवाज पौगंडावस्थेत येताच फुटतो, पण स्त्रीला नर्तन आणि पुरुषाला मात्र गंधर्वपद ही आपली सांस्कृतिक मानसिकता होती. ही कोंडी फुटणे अवघड आणि दुरापास्त वाटावी अशा स्थितीत हिराबाई बडोदेकर यांनी १९२२ मध्ये पहिल्यांदा जाहीर मैफिलीत गायन केले आणि ही कोंडी फुटली. त्यानंतरच्या काळात झालेले सामाजिक बदल अधिक वेगाने घडून आले. ‘आधी स्वातंत्र्य की आधी समाजसुधारणा’ या लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांच्यातील वादानंतर घडलेल्या या घटनांनी समाजाच्या काही स्तरांत तरी स्त्रियांच्या हक्काची जाणीव झाली. लक्ष्मणराव किर्लोस्करांनी सुरू केलेल्या ‘स्त्री’ मासिकाच्या संपादिका शांताबाई किर्लोस्कर यांनी पुण्यात विधवा महिलांचाही समावेश असलेले ‘हळदीकुंकू’ आयोजित करून समानतेला बळकटी देण्याचा प्रयत्न केला. मंगलप्रसंगी विधवांनी उपस्थित राहू नये यांसारख्या खुळचट कल्पनांनी बजबजलेल्या समाजाला जाग आली असे वरवर वाटत मात्र राहिले.
गुलाम म्हणून जगण्याची इच्छा कोणत्याही स्त्रीला असणे शक्य नाही. तरीही आज देशाच्या ग्रामीण भागातील सगळय़ा महिलांना पुरेसे स्वातंत्र्य मिळत नाही. त्यांच्या वेशभूषेवर मर्यादा आहेत, समाजातील वावरावरही बंधने आहेत. कोणा परपुरुषाबरोबर संवाद साधण्यासही नकार आहे. ही स्थिती बदलण्यासाठी केवळ कायदे उपयोगाचे नाहीत. समाजातील चालीरीतींकडे नव्या दृष्टीने पाहण्याची क्षमता निर्माण करून असल्या कालबा प्रथा बंद पाडण्यासाठी विवेकी पुरुषांनीही पुढाकार घ्यायला हवा. हेरवाड या गावाने एक पाऊल पुढे टाकलेले आहे. पुढची लढाई समाज म्हणून सगळय़ांनी मिळून लढायची आहे.