आंतरराष्ट्रीय अभ्यासकांस चीनच्या या भारतातील गाढवे पळवून वा चोरून नेण्याच्या योजनेमागे आरोग्यापेक्षाही काही अन्य गंभीर कारण असावे असे वाटते, असे कळते.
चीन मोठ्या प्रमाणावर आपली भूमीच हडप करण्याच्या प्रयत्नात आहे असे नाही, तर त्याची आपल्या गाढवांवरही नजर आहे. म्हणून तो देश मोठ्या प्रमाणावर गाढवांची तस्करी करीत असून गाढवे त्या देशासाठी आरोग्यदायी आहेत.
ही बातमी वाचून झालेल्या दु:खाची बरोबरी आपल्याकडे भावना दुखावण्याचा आजार कायमचा दूर झाल्यास होणाऱ्या आनंदाशीच व्हावी. हे दु:ख वा हा संभाव्य आनंद यांची तीव्रता सर्व आसमंतास कळवण्यासाठी कोणा सद्गृहस्थास खिंकाळीच ठोकावी असे वाटेल. या भावनोत्कटतेची प्रमुख कारणे दोन. पहिले म्हणजे या वृत्ताने आजपर्यंतचे सर्व प्रचलित समज धुरळा उडवल्यासारखे मागच्या दोन लत्ताप्रहारांनी हवेत उडवून दिले. आणि दुसरे असे की ज्याकडे आपण इतकी युगे, पिढ्यान्पिढ्या, वर्षानुवर्षे दुर्लक्ष केले त्यास परदेशातून त्यातही आपल्या बलाढ्य शेजाऱ्याकडून इतकी मागणी आहे हे आपणास कळूही नये? हे दुसरे कारण अधिक वेदनादायी. शालेय वयात ‘ढ’ गणला गेलेला आणि गणितात कायम भोपळा मिळवणारा उत्तरायुष्यात थेट रँग्लरच व्हावा हे जितके त्या शालेय शिक्षकांस वेदनादायी तितकेच हे वृत्त समस्त समाजास क्लेशकारी! हा क्लेश सदरहू विद्याथ्र्याची गुणवत्ता आपण जोखू शकलो नाही असे शिक्षकास वाटण्यात जितका असतो त्यापेक्षा अधिक सदर जीव आपल्यापेक्षाही हुशार निघाला या सत्याच्या प्रचीतीत असतो. असो. नमनालाच इतके घडाभर तेल जाळल्यानंतर हे वृत्त तरी काय हे सांगायला हवे. नपेक्षा वाचकांतील काही विचक्षण ‘गाढवापुढे वाचली गीता…’ या म्हणीचा आधार घ्यायचे.
तर हे वृत्त आहे गाढव या मानवस्नेही प्राण्याच्या भारतातून कमी होत चाललेल्या संख्येचे. वस्तुत: आसमंतावर चौफेर नजर टाकल्यास गाढवांची संख्या कमी होत चालली आहे यावरच मुळात विश्वास बसणे अवघड. पण तो ठेवायला हवा. कारण अविश्वास दाखवण्यासाठी काहीच मोजमाप न करता यशाचे दावे करता येतील अशी ही काही सरकारी योजना नाही. गाढवांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे यावर समस्तांनी विश्वास ठेवायचा कारण त्याची ठाम संख्या आहे. या संदर्भात अभ्यास करणाऱ्यांच्या मते ही घट तब्बल ६२ टक्के वा अधिकच असावी, हा दुसरा धक्का. तो अशासाठी की आपल्या आसपास गाढवेच गाढवे आहेत हे आपण किती गृहीत धरतो! या गृहीत धरण्याच्या स्वभावामुळे आपल्या आसपास प्रत्यक्षात या गाढवांची संख्या कमी झालेली आहे हे विदारक सत्य आपणास जाणवतच नाही. पण हे सत्य आहे. उदाहरणार्थ २०१२ सालच्या जनगणेनुसार या महासत्ता होऊ पाहणाऱ्या देशात साडेतीन लाखांच्या आसपास गाढवे भरलेली होती. पण २०१९ च्या पशुधन गणनेत मात्र त्यांची संख्या जेमतेम सव्वा लाखांच्या आसपास आढळली. हा हिशेब करताना त्यांच्या पशुगणनेचे वर्षही लक्षात घ्यायला हवे. ते मानवाप्रमाणे २०११ नाही, हा तो मुद्दा. त्यामुळे गणनेतील गैरसमज टळला. मानवांची आणि गाढवांची जनगणना एकाच वर्षात झाली असती तर उगाच नसत्या शंका निर्माण झाल्या असत्या. तसे होण्याची शक्यता तूर्त तरी नाही.
यात(ही) अर्थातच उत्तर प्रदेश हे राज्य मानाचा पहिला क्रमांक टिकवून आहे हीदेखील मोठीच अभिमानाची बाब म्हणायची. या राज्यांतून सर्वाधिक गाढवगळती झाल्याचे आकडेवारी दर्शवते. निवडणुकीच्या तोंडावर उत्तर प्रदेशातील गाढवांची संख्या कमी झाल्याचा तपशील उपलब्ध होणे याचे महत्त्व काही वेगळे सांगावयास नको. संबंधितांच्या पाहणीनुसार उत्तर प्रदेशातून ७१ टक्क्यांहून अधिक गाढवांची घट झाली. अर्थात सर्वात मोठ्या राज्यात गाढवेही अधिक असणार हे सांगावे लागणे हाच मुळात गाढवपणा ठरावा. असो. त्या राज्यास स्पर्धा आहे ती राजस्थान आणि गुजरात या राज्यांची. आकाराने इतक्या लहान राज्यांत मुळात इतकी गाढवे असावीत आणि त्यातली अनुक्रमे ७१ आणि ७० टक्के कमी व्हावीत हे जरा अचंबित करणारेच म्हणायचे! पण यात खरा धक्का बसतो तो बिहारी आकडेवारीने. ‘गड्या आपला बिहार बरा’ असे म्हणणाऱ्या गाढवांची संख्या त्या राज्यात अजूनही मोठ्या प्रमाणावर दिसते. कारण उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात वगैरे राज्ये चांगली ७० टक्के गाढवगळती दाखवत असताना बिहारातली घट मात्र जेमतेम ४७ टक्के इतकीच आहे. कदाचित अन्य राज्यांत बिहारीविरोधात झालेल्या वा होणाऱ्या आंदोलनांचा धसका या गाढवांनीही घेतला असावा. या गाढवगळती मापनात दक्षिणेतील एकमेव राज्य दिसते. ते म्हणजे आंध्र प्रदेश. त्या राज्यातून ५३ टक्के गाढवे कमी झाली. तसेही या गाढवगळतीत दक्षिणेतील राज्यांचा वाटा फार नाही. बहुधा त्यामागे त्या त्या राज्यांची विशिष्ट भाषा आणि लिपी यांचा संबंध असावा, असे आमचे मत. खरे तर यामुळे ‘गाढवांच्या कमतरतेत लिपीचा वाटा’ असा एखादा शोधनिबंधाचा विषय या निमित्ताने कोणा विद्यमान वा भावी प्राध्यापकास आढळू शकतो. असो. या पाहणीतून प्रत्येक मराठी जनाची छाती अभिमानाने फुलून यावी अशी बाब म्हणजे गाढवसंख्येतील घट सर्वात कमी आहे ती आपल्या या महाराष्ट्रात. महाराष्ट्रातील गाढवगळती फक्त ३९ टक्के इतकीच आहे. मराठी माणसाचे आपल्या मातीवर नितांत प्रेम. त्यामुळे ढवळ्याशेजारी बांधलेल्या पवळ्यास लागणाऱ्या गुणाप्रमाणे मराठी माणसाच्या या प्रेमाचा स्पर्श या मातीतील गाढवांसही झाला असल्यास आश्चर्य ते काय?
तथापि या आकडेवारीस एक वेदनेची किनार आहे. गाढवांच्या या संख्येतील घट ही काही नैसर्गिक नाही. म्हणजे गाढवांत कुटुंब नियोजन झाले अथवा त्यांच्या काही गंभीर साथीच्या आजारात गाढवेच्या गाढवे नामशेष होत गेली, असे झालेले नाही, तर यामागे पद्धतशीर डाव आहे. भारतातून गाढवे कमी करण्याचे एक कुटिल कारस्थान असून त्याची सूत्रे चीन या आपल्या तुल्यबळ देशाहाती आहेत. चीन मोठ्या प्रमाणावर आपली भूमीच हडप करण्याच्या प्रयत्नात आहे असे नाही, तर त्याची आपल्या गाढवांवरही नजर आहे. म्हणून तो देश मोठ्या प्रमाणावर गाढवांची तस्करी करीत असून गाढवे त्या देशासाठी आरोग्यदायी आहेत. चिनी प्राचीन वैद्यकांत गाढवाची कातडी मोठ्या प्रमाणावर विविध औषधांसाठी कच्चा माल म्हणून वापरली जाते. आयुष्य वाढवण्यासाठीही गाढवांच्या कातडीचा उपयोग चिनी वैद्यकात केला जातो. माणसांच्या आयुष्यवर्धनासाठी गाढवांची गरज लागावी हा मोठा काव्यात्म न्याय म्हणायचा. हे वाचून काहींच्या मनी आपल्या आयुर्वेदाने का बरे गाढवांकडे दुर्लक्ष केले असावे हा प्रश्न निर्माण होऊ शकेल. त्याचे उत्तर मात्र या पाहणीत नाही. शारीरिक आरोग्यासाठी आयुर्वेदाने का दुर्लक्ष केले याबाबत तर्कवितर्क लढवणे सामाजिक आरोग्यासाठी अयोग्य असल्याने हा प्रश्न अनुत्तरितच बरा.
तथापि काही आंतरराष्ट्रीय अभ्यासकांस मात्र चीनच्या या भारतातील गाढवे पळवून वा चोरून नेण्याच्या योजनेमागे आरोग्यापेक्षाही काही अन्य गंभीर कारण असावे असे वाटते, असे कळते. चीनमधे लोकशाही नाही. त्यावरून त्या देशास वारंवार टीकेस सामोरे जावे लागते. चीनवर टीका होताना भारताचे मात्र आपल्या लोकशाहीसाठी कवतिक होते हे चीनला नेहमी टोचते. तेव्हा या लोकशाहीला नख लावण्याच्या दीर्घकालीन कटाचा भाग म्हणून चीन आपली गाढवे पळवून नेत असावा असा काही जणांचा वहीम आहे. त्यात तथ्यही असावे. कारण गाढवेच नाहीशी झाली तर लोकशाही व्यवस्थेस सुरुंग लागू शकतो, असे चीनला वाटत असावे. तेव्हा चीनचा हा कट हाणून पाडण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर तातडीने काही विशेष गाढव पैदास योजना हाती घेण्याची गरज आहे. गाढवांच्या निर्मितीतील मर्यादा आणि अडथळे दूर करून जास्तीत जास्त संख्येने गाढवे निर्माण करणे हे आपले ध्येय असायला हवे.
The post गाढवे हवी आहेत! appeared first on Loksatta.