यंदाची जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा, गेल्या अनेक वर्षांत अजेय ठरलेला मॅग्नस कार्लसन सर्वोच्चपद राखण्यातला रस गेल्याचे संकेत देतो, हे विलक्षणच…
ट्विटरचा जॅक डॉर्सी किंवा टेस्लाचा एलॉन मस्क यांना यशाचा कंटाळा येतो तसेच हे? की, कार्लसन नव्यांची वाट खुली करून देतो आहे?
वय वर्षे ३१ हे काही एखाद्या खेळाडूचा प्रेरणाक्षय होण्याचे वय नव्हे. बुद्धिबळात तर नाहीच नाही. रॉबर्ट ऊर्फ बॉबी फिशरने स्वहस्ते जगज्जेतेपदावर पाणी सोडले, पण ते चक्रमपणाच्या झटक्यातून! विद्यमान जगज्जेता मॅग्नस कार्लसनच्या बाबतीत तसे काही संभवत नाही. त्याला काही कोणा ‘काळ्या सोव्हिएत साम्राज्या’शी टक्कर वगैरे घेण्याची गरज उरलेली नाही. २०१३ मध्ये चेन्नईत तत्कालीन जगज्जेता विश्वनाथन आनंदला तीन गुणांच्या फरकाने लीलया हरवून कार्लसन पहिल्यांदा जगज्जेता बनला. त्याच्या दोन वर्षे आधीच म्हणजे २०११ मध्ये कार्लसन जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचला. २०१४ मध्ये पुन्हा एकदा आनंदलाच हरवून त्याने एका युगाचा अंत घडवून आणला. पुढे तीन वेळा वेगवेगळ्या पण खूपच तरुण प्रतिस्पध्र्यांना पराभूत करून तो गत सप्ताहात पाचव्यांदा जगज्जेता बनला. पारंपरिक बुद्धिबळाबरोबरच कार्लसन जलद (रॅपिड) आणि अतिजलद (ब्लिट्झ) या प्रकारांमध्येही जगज्जेता आहे. त्याच्याबाबतीत आता काहीही फार धक्कादायक असे राहिलेले नाही. आनंदला त्याने दोन वर्षांत दोनदा पराभूत केले, त्या वेळी त्याच्या अजेयत्वाची फारशी चाहूल बुद्धिबळ विश्लेषक आणि आजी-माजी बुद्धिबळपटूंना लागली नव्हती. कारण रूढार्थाने आनंद हा बुद्धिबळाच्या तरल परिप्रेक्ष्यात ‘जुन्या’ पिढीचे प्रतिनिधित्व करत होता. या पिढीने शिखर गाठण्यासाठी प्राधान्याने पुस्तकी ज्ञान आणि पटावरील सरावाचा वापर केला. शिवाय आनंद कार्लसनशी खेळला, त्या वेळी त्याने वयाची चाळिशी ओलांडलेली होती. याउलट कार्लसनने विशीत प्रवेश केला होता. या पिढीने लहान वयातच बुद्धिबळाच्या तयारीसाठी संगणकांचा, बहुकोट चालींचे अत्यंत सखोल विश्लेषण करू शकणाऱ्या प्रणालींचा आधार घेतला. अंत:प्रज्ञेला (इन्ट्यिूशन) अफाट संगणकीय तयारीची जोड दिल्यामुळे या पिढीचा पटावरील खेळाचा स्तर विलक्षण उंचावलेला आहे. त्यामुळे शारीरिक व मानसिक ऊर्जा, तसेच तयारी करण्याची क्षमता अशा अनेक निकषांवर कार्लसन पहिल्या सामन्यापासून वरचढ ठरला, जे सर्वथा अपेक्षितच होते. परंतु आणखी एक बाब कार्लसनच्या पथ्यावर पडणारी होती. ती होती प्रेरणा! आनंदसाठी जगज्जेतेपदाची नवलाई अशी फारशी राहिलेली नव्हती. २०१३ मधील लढत खेळेपर्यंत तो पाच वेळा जगज्जेता बनलेला होताच. याउलट कार्लसनसाठी जगज्जेतेपद – पारंपरिक प्रकारातील जगज्जेतेपद – हा इतर कोणत्याही आघाडीच्या बुद्धिबळपटूप्रमाणे सर्वाेच्च प्रेरणास्रोत होता. आज हाच स्रोत आटल्याची कबुली खुद्द कार्लसन देतो. त्यामुळे जगज्जेतेपद राखण्यातच त्याला रस उरलेला नाही, हे तर विलक्षण अद्भुतच.
आनंदनंतरचे कार्लसनचे तिन्ही प्रतिस्पर्धी जवळपास जगज्जेत्याला समवयस्क. २०१६ मध्ये रशियाचा सर्गेई कार्याकिन, २०१८ मध्ये अमेरिकेचा फॅबियानो करुआना आणि २०२१ मध्ये रशियाचा इयन नेपोम्नियाशी जगज्जेतेपदासाठी झुंजले. तिघेही कार्लसनप्रमाणेच संगणकीय पिढीचे प्रतिनिधी. पैकी कार्याकिन आणि करुआना यांच्याविरुद्ध १२ डावांच्या पारंपरिक टप्प्यात कार्लसनला विजय मिळवता आला नव्हता. तेथे विजेता ठरवण्यासाठी जलद डावांचा अवलंब करावा लागला. परवा जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत नेपोम्नियाशीविरुद्ध मात्र त्याने ७.५-३.५ (ही लढत १४ डावांची होती) असा जवळपास एकतर्फी विजय मिळवला. जलद डावांपर्यंत लढत गेलीच नाही. बुद्धिबळात गेल्या १०० वर्षांमध्ये इतकी एकतर्फी लढत पाहायला मिळाली नव्हती. परंतु सहाव्या डावापर्यंत तशी ती नव्हती. नेपोम्नियाशी जय्यत तयारी करून आला होता. तो बहुधा चमत्कार घडवणार अशी शंका काहींनी व्यक्तही करून झाली. सहावा डाव १३० चालींपर्यंत चालला. सायंकाळी सुरू झालेला हा डाव मध्यरात्र उलटून गेली तरी सुरू होता. १०० चालींपर्यंत पटावर साधारण बरोबरीची स्थिती होती. एखादा असता, तर बरोबरी मान्य करून पुढील दिवसाच्या तयारीसाठी किंवा विश्रांतीसाठी निघून गेला असता. कार्लसन अशांपैकी नाही! त्याचे आजवरचे सर्वांत लक्षवेधी वैशिष्ट्य म्हणजे, पटावर बरोबरीची स्थिती अशी काही असत नाही हा त्याचा हट्टाग्रह. त्यामुळे पटावरील स्थितीचे संगणकीय मूल्यांकन ‘शून्य’ म्हणजे ‘ठार बरोबरी’ असे दर्शवत असले, तरी कार्लसन बऱ्याचदा खेळत राहतो. या असीम लढाईसाठी आवश्यक अक्षय ऊर्जा हे कार्लसनचे आणखी एक वैशिष्ट्य. त्याचा खेळ फारसा आकर्षक नाही. ‘मोझार्ट ऑफ चेस’ वगैरे त्याच्या नावापुढे चिकटलेले बिरुद चुकीच्या गृहीतकावर आधारित आहे. बुद्धिबळातील ‘एस्थेटिक्स’ किंवा सौंदर्यभानाची तमा त्याने कधीही बाळगली नाही. चित्ताकर्षक सुरुवात करावी, मोहऱ्यांचे धडाधड बळी देत पटावर ‘रक्तपात’ घडवत स्वत:च्या प्रतिभेची आणि त्याहीपेक्षा बेडरपणाची चुणूक दाखवत टाळ्या मिळवाव्यात हा कार्लसनचा खाक्या नाही. सर्जनशीलतेपेक्षाही त्याची गणनक्षमता अत्युच्च कोटीची आहे. गुंतागुंतीच्या स्थितीतही कार्लसनच्या बहुतेक चाली शक्तिशाली संगणक प्रणालींना ‘मान्य’ असतात! याच क्षमतेच्या आधारावर पाच वेळा पारंपरिक जगज्जेतेपद, तीन वेळा रॅपिड जगज्जेतेपद, पाच वेळा ब्लिट्झ जगज्जेतेपद त्याने पटकावले. २८८२ हे बुद्धिबळातील आजवरचे सर्वोच्च एलो मानांकन, वयाच्या १९व्या वर्षापासूनच बुद्धिबळ क्रमवारीत अग्रस्थान, १२५ डावांमध्ये अजेय राहणे वगैरे अचाट विक्रम त्याच्या नावावर आहेत.
कार्लसनची बुद्धिबळाविषयी आस्था संपलेली नाही, पण पारंपरिक जगज्जेतेपदाच्या लढतींचा त्याला कंटाळा आला आहे. नवीन काही जिंकण्यासारखे राहिलेले नाही अशी त्याची तक्रार. भविष्यात जगज्जेतेपद राखण्यात आपल्याला रस नाही असे त्याने जाहीरच करून टाकले. अपवाद एका प्रतिस्पर्ध्याचा. त्याचे नाव अलीरझा फिरूझा. मूळचा इराणचा पण सध्या फ्रान्सकडून खेळणारा अलीरझा सध्या जागतिक क्रमवारीत कार्लसनपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर आहे. २८०० एलो मानांकन मिळवणारा सर्वांत युवा बुद्धिबळपटू बनताना अलीरझाने कार्लसनचाच विक्रम मोडला! अलीरझा पुढील वर्षी होणाऱ्या कँडिडेट्स स्पर्धेत खेळेल. ती जिंकली, तर त्याच्या पुढील वर्षी म्हणजे २०२३ मध्ये कार्लसनशी जगज्जेतेपदाचे द्वंद्व. अलीरझा नसेल, तर कार्लसनसमोर स्वयंघोषित आव्हान राहील २९०० एलो गुणांचा टप्पा ओलांडण्याचे. कदाचित अशा प्रकारे विधान करून कार्लसनने अलीरझावर दबावही आणलेला असू शकतो. बुद्धिबळात हे नवीन नाही. कार्लसनच्या सर्वांत अलीकडच्या प्रतिस्पर्ध्याने (नेपोम्नियाशी याने) कार्लसनसकट सर्वांची निराशा केली. पण त्याच्याशी टक्कर घेऊ शकतील असे युवा बुद्धिबळपटू नाहीतच असे नव्हे. कधी काळी गॅरी कास्पारॉवही अजेय वाटायचा, पण त्याला तो सर्वोच्च स्थानावर असताना व्लादिमीर कॅ्रमनिक भेटलाच! कार्लसनचा प्रेरणाक्षय सध्या प्रचलित कल दर्शवणारा ठरतो. शिखरावर असतानाही ट्विटरचा जॅक डॉर्सी किंवा टेस्लाचा एलॉन मस्क यांना यशाचा कंटाळा का येऊ लागतो? फार लवकर यश हाती आल्याचा हा एक दुष्परिणाम समजावा काय? कार्लसनने सुरुवातीपासूनच जगज्जेतेपदाच्या दीर्घ लढतीच्या स्वरूपाविषयी नाराजी व्यक्त केलेली आहे. त्याऐवजी छोट्या लढती घ्याव्यात किंवा बाद फेरीसारखे त्यांचे स्वरूप असावे असे त्याला वाटते. बुद्धिबळाविषयीचे आकर्षण जगभर सर्वोच्च पातळीवर आहे. ऑनलाइन बुद्धिबळाचा फैलाव, ‘क्वीन्स गॅम्बिट’सारखे नेटफ्लिक्सपट, अमेरिकेचे या खेळातील वाढते वर्चस्व, भारत व चीन या अजस्रा देशांतील वाढती लोकप्रियता व लोकाश्रय ही काही कारणे. कार्लसनने स्वत:च या खेळातील एकसुरी मक्तेदारी मोडीत काढण्याचे ठरवून निराळा आदर्श निर्माण केला आहे, हे नक्की.
The post जगज्जेत्याचा प्रेरणाक्षय… appeared first on Loksatta.