राजकारणाच्या माध्यमातून काही साध्य करावयाचे असेल तर अंगी दांडगटपणा किंवा उच्च दर्जाचे होयबा होण्याची तयारी हवी असे अलीकडे मानले जाऊ लागले आहे.
सध्याच्या राजकारणात एकापेक्षा एक नामचीन वगैरे गणंगांचे स्वागत पायघडय़ा घालून केले जात असताना प्रभू यांच्यासारखा माणूस नकोसा होणे नैसर्गिक ठरते. राजकारण/समाजकारणातील असे सर्वच प्रभू दमून प्रवास सोडणार असतील तर ते चिंतेचे आहे.
अर्थसंकल्पीय बातम्यांच्या रगाडय़ात एका महत्त्वाच्या बातमीस आतील पानांत जावे लागले. ती म्हणजे निवडणुकीच्या राजकारणाचा त्याग करण्याची सुरेश प्रभू यांची घोषणा. यापुढे पर्यावरणासारख्या क्षेत्रात झोकून देण्याचा मानस प्रभू यांनी व्यक्त केला असून त्यासाठी निवडणुकीचे राजकारण यापुढे करणार नसल्याचे ते म्हणतात. त्यांच्यासारख्याच सभ्य, मूल्याधारित राजकारणासाठी ओळखल्या जाणाऱ्या मधु दंडवते यांचा पराभव करून सुरेश प्रभू निवडणुकीय राजकारणाच्या रिंगणात शिरले. प्रथम शिवसेना, त्या पक्षातर्फे अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारख्या सहिष्णु आणि सुसंस्कारित पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळात पर्यावरणमंत्री, नंतर भाजपत प्रवेश, नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात वाणिज्यसारख्या जागतिक महत्त्वाच्या खात्याचे मंत्री, रेल्वे मंत्रालयाची प्रभावी हाताळणी आणि मग अचानक डच्चू असा प्रभू यांचा प्रवास. वाणिज्य मंत्रालयाची जबाबदारी त्यांच्याकडे होती तेव्हा ‘आंतरराष्ट्रीय व्यापार संघटने’च्या काही कळीच्या चर्चात त्यांचा भारतातर्फे सहभाग होता. या वा अशा अनेक बुद्धिप्रधान आंतरराष्ट्रीय मंचांवर प्रभू यांनी भारताचे यशस्वी प्रतिनिधित्व केले.
रेल्वे मंत्रालयातही त्यांची कामगिरी अत्यंत उठावदार होती. रेल्वेचा आर्थिक डोलारा सावरणे आणि कोणत्याही नव्या गाडय़ांची घोषणा न करता, प्रसिद्धीच्या मागे न लागता व्यवस्थेत सुधारणा करणे यांस त्यांनी प्राधान्य दिले. केंद्र सरकारच्या अन्य कोणत्याही खात्यास स्वतंत्र अर्थसंकल्प मांडण्याचा विशेषाधिकार नाही. रेल्वेसाठी असा स्वतंत्र अर्थसंकल्प असण्याची ब्रिटिशकालीन प्रथा कालबाह्य झालेली आहे, तेव्हा स्वतंत्र अर्थसंकल्पाची गरज नाही असे स्वत: सांगत त्यांनी हा अर्थसंकल्प बंद होण्यासाठी प्रयत्न केले. स्वत:चे अनावश्यक अधिकार स्वत:च कमी करणाऱ्या व्यक्ती अलीकडे विरळाच. प्रभू त्यातील एक. रेल्वे स्थानकात रेल्वेमंत्री कधीही आला तरी त्यास रेल्वे सुरक्षा दलातर्फे ‘मानवंदना’ देण्याची मागास प्रथा अलीकडेपर्यंत होती. ती बंद होण्यासाठीही प्रभू यांचे प्रयत्न होते. मंत्रिपदी असतानाही रेल्वेच्या फलाटावर स्वत:च्या बॅगा स्वत:च उचलून मार्गस्थ होणाऱ्या या राजकारण्यास निवडणुकीच्या राजकारणाचा त्याग करावा असे वाटत असेल तर ती घटना खचितच विचार करायला लावणारी. सभ्य, अभ्यासू अशांनी अधिकाधिक संख्येने राजकारणात यावे अशी इच्छा बाळगणारे आणि अशांचे प्रतिनिधित्व करत असल्याचा दावा करणारे सत्तापदी असताना प्रभू यांस असे का वाटले असावे?
राजकारणाचा बदलता पोत हे त्याचे उत्तर. प्रभू प्रथम शिवसेनेत होते. त्या पक्षाची जातकुळी आणि प्रभू यांचे व्यक्तिमत्त्व यांत दुरान्वयानेही काही संबंध नव्हता. नारायण राणे आणि सदृशांची त्या वेळी त्या पक्षात चलती होती आणि प्रभू यांस त्यांचा हात धरून चालावे लागत होते. केंद्रीय ऊर्जा खात्यातील त्यांची कामगिरी अभिनंदनीय होती. विशेषत: ‘एन्रॉन’ वादाच्या पार्श्वभूमीवर या क्षेत्राच्या नियमनासाठी त्यांनी केलेल्या उपाययोजनांच्या पायावर आज या क्षेत्राचा विस्तार दिसून येतो. तथापि पर्यावरण, उद्योग, हवाई वाहतूक अशा विविध कळीच्या खात्यांचे मंत्री असूनही पक्षाच्या ‘अपेक्षा’ पूर्ण करता न आल्याने प्रभू यांचे महत्त्व कमी झाले. एका बाजूने नदीजोड योजना, आंतरराष्ट्रीय परिषदादी कार्यक्रमांतील सक्रिय सहभाग आणि दुसरीकडे हे असे जमिनीवरील राजकारण यांतील विसंगती त्यांच्याबाबत अधिक उठावदार. त्यातूनच त्यांचा सेना-वास संपला. त्या वेळी प्रभू यांच्यासारखी व्यक्ती आमच्या पक्षात अधिक योग्य असे म्हणत प्रभू यांना भाजपने आपले म्हटले.
या पक्षात आल्यावरही मोदी सरकारच्या काळात त्यांच्याकडे काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या गेल्या. ‘जी २०’सारख्या परिषदांत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आणि विमान वाहतूक खात्याचे मंत्री या नात्याने हवाई मार्गाने मालवाहतुकीसाठी पहिले धोरणही त्यांनी आणले. सध्या ज्या ‘उडान’ योजनेचा गवगवा केला जातो, ती प्रभू यांच्या काळातील. लेह-लडाखपर्यंत रेल्वे जाळे विस्तारण्याचा प्रारंभही त्यांच्या काळातील. असे असताना आणि प्रभू यांच्याकडे अधिक महत्त्वाची जबाबदारी येणार अशी अपेक्षा असताना साध्या एका निरोपाद्वारे ते मंत्रिमंडळातून वगळले गेले. ही वजाबाकी का झाली याची पूर्वकल्पना वा नंतर किमान माहिती तरी त्यांना शीर्षस्थ नेत्यांनी दिली किंवा काय, हा प्रश्न.
दिल्लीत प्रभू आणि माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर हे एकमेकांचे सख्खे शेजारी. दोघेही राजधानीत तितकेच दुर्लक्षित. पर्रिकर या जगातूनच गेले. बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात त्यांच्याशी स्पर्धा करू शकणारे प्रभू आता राजकारणातून दूर होण्याची भाषा करतात. पर्रिकर मनस्वी होते आणि प्रभू सहनशील. प्रभू यांचा ‘बुलेट ट्रेन’ प्रकल्पास विरोध होता, असे म्हणतात. त्याबाबत त्यांनी कधीही चकार शब्द काढलेला नाही आणि तसा ते तो काढण्याची शक्यताही नाही. त्यामुळे आपण अचानक नकोसे का झालो याचे स्पष्टीकरण त्यांच्याकडून येण्याची शक्यता कमीच. त्याची गरजही नाही. कारण हे असे का होते हे न कळण्याइतका विचारशक्तीचा ऱ्हास अद्याप सर्वाचा झालेला नाही. सध्याच्या राजकारणात एकापेक्षा एक नामचीन वगैरे गणंगांचे स्वागत पायघडय़ा घालून केले जात असताना प्रभू यांच्यासारखा माणूस नकोसा होणे नैसर्गिक ठरते. अशा बुद्धिवान सत्शीलांस नाकारणारा पक्ष म्हणून एके काळी काँग्रेसची संभावना होत असे. यात मध्यमवर्गीय म्हणवून घेणारे आणि नैतिकतेचा मक्ता जणू आपल्याकडेच असे स्वघोषित नीतिमान आघाडीवर असत. यातील कोणीही प्रभू यांचे नंतर जे काही झाले त्याविषयी जनात सोडा, पण मनातल्या मनातही खंत व्यक्त करण्याची हिंमत दाखवली नसेल.
येथे प्रभू यांची कड घेण्याचा वा त्यांस काही सहानुभूती मिळावी असा काही उद्देश नाही. त्याची गरज ना प्रभू यांस आहे ना ‘लोकसत्ता’स. आपल्याकडील एकंदर सांस्कृतिक/ सामाजिक/ राजकीय स्तर लक्षात घेता काही मिळण्यापेक्षा न मिळणे अधिक अभिमानाचे आहे याची जाणीव अनेकांस एव्हाना होऊ लागली असेल. तेव्हा प्रभू यांस काय मिळाले वा मिळाले नाही, याची चर्चा करण्यात या स्तंभास बिलकूल स्वारस्य नाही. तर नेमस्त, संयत, अभ्यासू आदींस राजकारणाचा आकुंचित होत असलेला पैस आणखी किती आटणार हा मुद्दा आहे.
राजकारणाच्या माध्यमातून काही साध्य करावयाचे असेल तर अंगी काही दांडगटपणा तरी हवा किंवा उच्च दर्जाचे होयबा होण्याची तरी तयारी हवी असे अलीकडे मानले जाऊ लागले आहे. पहिला गुण असेल तर हवे ते न मिळाल्यास हिसकावून घेता येते आणि दुसऱ्या गुणामुळे श्रेष्ठींचा कृपाप्रसाद म्हणून काही पदरात पडते. या दोन्हींची उदाहरणे आसपास विपुल आढळतील. त्यात खऱ्याखोटय़ाचा अंश किती हे लक्षात घेणे हे ज्याच्या त्याच्या राजकीय प्रामाणिक जाणिवांवर अवलंबून. शिवाय या वास्तवाकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करण्याचा पर्याय आहेच. तोच निवडण्याकडे बहुसंख्याकांचा कल असला आणि तेच होणार असले तरी धैर्य आणि विचारक्षमता शाबूत असणाऱ्यांनी या भीतीदायक वास्तवाचा विचार जरूर करायला हवा. प्रभू ही एक व्यक्ती नाही. राजकारणात शिरून काही करू पाहणाऱ्या अनेकांचे प्रतीक अशी प्रवृत्ती आहे. असे अनेक असतील. त्या सर्वास ‘हे क्षेत्र आपले नाही’ असे वाटत असेल तर अशा व्यक्तींत नव्हे तर राजकारणात खोट आहे हे लक्षात घ्यायला हवे. राजकारण/समाजकारणातील असे सर्वच प्रभू दमून प्रवास सोडणार असतील तर आपणा सर्वासाठी ती चिंतेची परिस्थिती ठरते.
The post ‘प्रभु’ अजि दमला..? appeared first on Loksatta.