नागरिकांचा उत्सवी अधिकार मान्य करतानाच त्यांच्या उत्सवी उत्साहास लसीकरणचे कवच वेळीच पुरवण्याचा धोरणीपणा या देशनेतृत्वांच्या अंगी होता..
जगाचे आर्थिक, लष्करी आदी नेतृत्व भले अमेरिकेकडे असेल. पण विश्वाच्या सांस्कृतिक नेतृत्वाचा मान मात्र निर्विवाद युरोप-खंडाकडे जातो. पाच-सहाशे वर्षांपूर्वी गॅलिलिओ, लिओनार्दो द विंची, मायकेल एंजेलो आदी महानुभावांच्या कार्यातून सुरू झालेल्या पुनरुत्थानाने मानवजातीस धर्मसत्तेच्या जोखडातून सोडवले. त्याच युरोपातून पुढे आधुनिक सुसंस्कृत मानवी मूल्यांचा जगभर प्रसार झाला. तोच युरोप विसाव्या शतकात दोन दोन महायुद्धांत कोळपून गेला. पण तोच युरोप त्या राखेतून उभा राहात अमेरिकेच्या डोळ्यास डोळा भिडवण्याइतका सक्षम झाला. आता, गेले वर्षभर करोना-कहरात कंटाळलेल्या, माना टाकून बसलेल्या, आंबलेल्या जगाला आपल्या कृतीतून पुन्हा एकदा त्याच युरोपाने पल्लवित केले आहे. संपूर्ण जग या करोनाने हतबल होऊन थिजलेले असताना त्यावर मात करून पूर्वीसारखे उत्फुल्ल जगता येऊ शकते. नव्हे तसेच जगायला हवे. हा नितांत आवश्यक धडा देणारा युरोप हाच. पॅरिसच्या रोला गॅरोसवर दीड महिन्यापूर्वी ३० मेपासून सुरू झालेला मानवी प्रतिभा, क्षमता, कलात्मकता यांचा अनोखा उत्सव लंडनच्या विम्बल्डनमार्गे वेम्ब्ली स्टेडियममधे भारतीय प्रमाणवेळेनुसार रविवारी उत्तररात्री संपला तो जगभरांतील निराश मनांवर उत्साहाचे शिंपण करून. व्यवहारी भाषेत या उत्सवातील सहभागींना भले खेळाडू म्हटले जात असेल, पण ते वर्णन पुरेसे नाही. सांस्कृतिक जगाच्या सुप्त आशाआकांक्षा, मनीषा आणि अपरिहार्य स्पर्धात्मकता यांस आपल्या देहमाध्यमाद्वारे आविष्कृत करणारे हे सारे कलावंतच! त्या प्रतिभेचा गौरव करण्यासाठी त्यांच्या या उत्सवाची दखल घेणे आवश्यक ठरते.
महायुद्धाइतका नसेल आणि स्थावर-जंगमास याची झळ लागली नसेल पण करोना-साथीने सर्वाधिक विदग्ध केले ते युरोपला. उत्फुल्ल, पण तरी जबाबदार जीवनशैलीने जगणाऱ्या या देशांना करोनाने खिंडीत पकडले. लक्षावधींचे जीव तर त्यातून गेलेच. पण जगणे कोंडवाडय़ात बंदिवान बनले. या त्यांच्या जीवनस्वातंत्र्याचे मूल्य ज्यांनी अनुभवले आहे त्यांनाच कळेल. या मूल्यांस उच्चकोटीचे सांस्कृतिक आवरण आहे. म्हणूनच करोनाच्या टाळेबंदीतही फ्रेंचांना आपली वस्तुसंग्रहालये बंद करून त्यातील अमूल्य कलाकृतींस आस्वादकापासून तोडावे असे वाटत नाही. आपल्या संगीतिका पुन्हा मंचावरून सदेह अनुभवण्याची आस ऑस्ट्रियनांना लागते. टाळेबंदी शिथिल झाल्या झाल्या समस्त इटालियन महिला सौंदर्यवर्धनगृहांकडे धाव घेतात (जाता जाता: जगात सर्वाधिक दरडोई ब्यूटी पार्लर या देशात आहेत) आणि ब्रिटिशांना वाहत्या रस्त्यांकडेच्या कॉफी हाऊस वा पब्जमध्ये कधी एकदा जायला मिळेल असे होते. म्हणून आपले सांस्कृतिक प्रतीक असलेले क्रीडा महोत्सव यंदा तरी भरणार का, असा प्रश्न प्रत्येक युरोपीय नागरिकाच्या मनात होता. वर्षभराच्या एकलकोंडय़ा शांततेने हे देश या उत्सवांसाठी आसुसलेले होते. यात लक्षात घ्यावी अशी बाब म्हणजे या युरोप खंडातील अनेक देशांत विखुरलेले नागरिक आणि त्या त्या देशांची सरकारे यांच्या जाणिवा भिन्न नाहीत. म्हणून फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँ टाळेबंदी संपवल्या संपवल्या स्वत: रस्त्यावरच्या कॅफेत जाऊन बसतात आणि आता शाळा सुरू होऊन मुलांची किलबिल कानावर येईल या केवळ कल्पनेने ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन शब्दश: मोहरून जातात. पण तरी ही सर्व भावनोत्कटता साजरी होत असताना करोना प्रतिबंधासाठी लस संशोधनास गती देण्यास ते चुकत नाहीत आणि लस तयार झाल्या झाल्या आपल्या नागरिकांच्या अतिव्यापक लसीकरणाचा कार्यक्रमही ते तितक्या सक्षमतेने राबवतात. भावनांची रांगोळी घालण्याआधी बुद्धिजन्य कृतींचे सर्व ठिपके जोडले जातील याची खबरदारी घेण्याची जागरूकता किती महत्त्वाची हे यांच्या कृतीतून दिसते.
आणि मग त्यास रोलॉ गॅरोस वा विम्बल्डन आणि अखेर युरो कप या स्पर्धेसारखा समाधानाचा प्रतिसाद मिळतो. यातही युरोपचे वैशिष्टय़ आणि मोठेपण समजून घ्यायचे असेल तर त्याच वेळी अमेरिका खंडातील ‘कोपा अमेरिका’ या फुटबॉलचे उदाहरण घ्यावे. त्या खंडातील मोजके काही सोडले तर बरेचसे देश तिसऱ्या जगाशी परिचित साधर्म्य राखणारे. त्यांनी ही स्पर्धा भरवली खरी. पण प्रेक्षकांविना. मेसीचा अर्जेटिना हा नेमारच्या ब्राझीलला हरवताना स्टेडियम रिकामे असणे ही त्या खंडातील समस्त नागरिकांची चेष्टाच. पण तशी ती युरोपातील नागरिकांची झाली नाही. कारण आपल्या भूमीतील सर्वसामान्यांस किती नागरिकांना प्रत्यक्ष हजर राहता येईल, त्याची पथ्ये काय आदी तपशील वेळीच प्रसृत करून युरोपीय आयोजकांनी आपल्या नागरिकांना करोनापूर्व आयुष्याकडे जाण्याचा मार्ग सुकर करून दिला. यातही विशेष कौतुक विम्बल्डन आणि युरो कपच्या अंतिम सामन्यांचे. या दोन्हींस स्टेडियमभरून प्रेक्षकांना अनुमती दिली गेली. इतकेच नव्हे तर विम्बल्डनसाठी ज्यांना तिकीट मिळाले नसेल त्यांना प्रांगणातल्या ‘हेनमन हिल’वर सहकुटुंब पहुडत सामने पाहण्याच्या आड या स्पर्धेचे आयोजक अजिबात आले नाहीत. किंवा युरो कप अंतिम स्पर्धेच्या आधी आपल्या समस्त पब्जमधून माणसे आणि त्यांच्यासाठी उत्साहवर्धक द्रव या दोन्हींच्या मुक्त प्रवाहास बंधारे घालण्याचा उद्योग ब्रिटिश सरकारने केला नाही. कारण माणसे घराबाहेर पडणे, एकमेकांना सदेह भेटणे हे केवळ त्यांच्या आनंदासाठीच नव्हे तर देशाच्या अर्थव्यवस्थेसाठीही आवश्यक आहे याची रास्त जाणीव युरोपीय देशांस आहे. या संपूर्ण करोनाकाळात या देशांच्या धुरीणांनी आपल्या तिजोऱ्या सढळपणे आपल्या नागरिकांवर उधळल्या. तसे केले तरच नागरिकांकडून याची दामदुप्पट परतफेड आपल्याला होईल याची शहाणी समज या सरकारांस होती.
म्हणूनच करोना, त्याच्या साथीत दुरावलेले आपले आप्तेष्ट वा या आजाराच्या भीतीची गेल्या वर्ष-दीड वर्षांची काजळी आदींचा कसलाही कटूपणा न बाळगता नागरिकांनी प्रचंड संख्येने या क्रीडा महोत्सवास प्रतिसाद दिला. यात पुन्हा लक्षात घ्यावा असा एक मुद्दा आहे. फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन या स्पर्धाचे दोन्हीही, पुरुष आणि महिला, विजेते हे युरोपीयच. नोव्हाक जोकोव्हिच हा सर्बियाचा आणि बार्बारा क्रेश्कोव्हा ही झेक. विम्बल्डनच्या पुरुष विजेतेपदासाठी तर दोन्ही स्पर्धकदेखील युरोपीयच होते. नोव्हाक आणि त्याचा आव्हानवीर मॅतिओ बारिटिनी हा इटलीचा. अपवाद फक्त विम्बल्डनच्या महिला विजेतीचा. अॅश्ले बार्टी ही ऑस्ट्रेलियाची. तिच्याविरोधात होती ती कॅरोलिना प्लिस्कोव्हा ही झेक. म्हणजे पुन्हा युरोपच. या तुलनेत ‘युरोकप स्पर्धे’त फक्त युरोपीय देश असणार हे उघडच. या स्पर्धेचे बहुचर्चित विजेतेपद इटलीने पटकावले. त्या देशासमोर होते इंग्लंड. हे दोन्ही देश करोनाने पार खिळखिळे झालेले. रशिया, जर्मनी, फ्रान्स, स्पेन, नेदरलँड्स, बेल्जियम अशा २४ देशांचा सहभाग या स्पर्धेत होता. करोनाकाळातही ११ देशांत ही स्पर्धा खेळवली गेली आणि प्रेक्षकांना प्रत्यक्ष हजर राहून ती पाहता आली. कमीअधिक प्रमाणात या सर्वच देशांना करोनाचा फटका बसला. पण म्हणून ते देश नागरिकांवर टाळेबंदीचा वरवंटा फिरवण्यातच धन्यता मानत बसले नाहीत.
तथापि महत्त्वाचा फरक असा की नागरिकांचा उत्सवी अधिकार मान्य करतानाच त्यांच्या उत्सवी उत्साहास लसीकरणचे कवच वेळीच पुरवण्याचा धोरणीपणा या देशनेतृत्वांच्या अंगी होता. त्यामुळे नागरिकांची गर्दी पाहून यातील कोणाची छाती धडधडली नाही. उलट या सर्वाची धडपड होती, आणि आहे, नागरिकांचे आयुष्य लवकरात लवकर करोनापूर्व कालाप्रमाणे व्हावे यासाठी. नागरिकांना ‘दो गज की दूरी’ वगैरेचा सल्ला देताना आपण काय खबरदारी घ्यायला हवी हे कळण्याइतकी प्रगल्भता युरोपीय सत्ताधीशांनी दाखवली. म्हणूनच दरहजारी करोनाबाधित, बळींचे प्रमाण, विक्रमी लसीकरण वगैरे बडबडीत न अडकता जे करायला हवे ते त्यांनी करून दाखवले. हा करोनोत्तर रेनेसाँ महायुद्धोत्तर रेनेसाँप्रमाणे जगास बरेच काही शिकवून जाणारा. त्या रेनेसाँप्रमाणे या रेनेसाँकडूनही काही शहाणे तरी निश्चित धडा घेतील.
The post युरोपचा रेनेसाँ! appeared first on Loksatta.