पीकपाण्यात बदल करण्यापासून ते कृषी हंगामाच्या वेळापत्रकापर्यंत अनेक आघाड्यांवर आपणास तातडीने बदल करावे लागणार आहेत.
भव्य रस्ते, त्यासाठी डोंगरकपात, जलविद्युत प्रकल्पांसाठी धरण उभारणी त्यासाठी पुन्हा डोंगरकपात आणि भौगोलिकदृष्ट्या अस्थिर प्रदेशात जमिनीवरील भार वाढेल असे प्रकल्प हे आपण शहाणपणास किती मागे सोडले हे दाखवून देणारे आहे.
देवभूमी वगैरे असलेल्या उत्तराखंडात पुराने उडालेल्या हाहाकारावर भाष्य करण्याआधी काही आकडेवारी पाहू. नैनितालच्या मुक्तेश्वर परिसरात सोमवार-मंगळवार या २४ तासांत ३४०.८० मिलीमीटर, म्हणजे साधारण ३५ सेंमी इतका पाऊस पडला. हा १८९७ पासूनचा विक्रम. याच काळात पंतनगर परिसरात पडलेला पाऊस ४१ सेंमी इतका आहे. यंदाच्या ऑक्टोबरात पहिल्या पंधरवड्यात कोसळलेला पाऊस हा सरासरीपेक्षा ४८५ टक्क्यांनी अधिक आहे. चामोली परिसरात या महिन्यात सरासरी ०.६ मिमी इतका पाऊस पडतो. यंदा तो १२७.५० मिमी इतका कोसळला. त्याच वेळी उधमसिंग नगर परिसराची पावसाची सरासरी १.६ मिमी इतकी असताना प्रत्यक्षात पडलेला पाऊस २३२.१० मिमी इतका आहे. या दोन्ही ठिकाणी पडलेला पाऊस सरासरीच्या तब्बल १० हजार टक्के इतका अधिक आहे. गेल्या पाच वर्षांत एकट्या उत्तराखंड परिसरात घडलेल्या ढगफुटीच्या घटना आहेत सात हजार ७५० इतक्या. त्याच वेळी यंदाच्या वर्षात फक्त जुलैपर्यंत ९७९ ठिकाणी ढगफुटी नोंदली गेली. गेल्या वर्षी ही संख्या एक हजार ६३२ इतकी होती आणि त्याआधीच्या वर्षात ती होती तीन हजार ७०६ इतकी. गेल्या सहा वर्षांत, म्हणजे २०१४ पासून, या परिसरात पाऊस/भूस्खलन आदींत बळी पडलेल्यांची संख्या आहे चार हजार इतकी आणि या काळात भूस्खलनाचे प्रकार घडले एक हजार ९६१ इतके. एकट्या नैनिताल परिसरात डोंगरकड्यांवर, उतारांवर सात हजारांहून अधिक घरे, इमारती उभारल्या गेल्या. त्यासाठी लक्षावधी झाडांचे बळी गेले आणि पण २०१५ ते २०१९ या चार वर्षांच्या काळात जंगलवृद्धी एक टक्का इतकीही झाली नाही. अलीकडेच या राज्यासाठी केंद्र सरकारने पाच हजार कोटींहून अधिक रुपयांचे अनेक प्रकल्प मंजूर केले. त्यात दोन हजार ५८४ कोटी रुपये जम्रानी धरणासाठी, १२०० कोटी रुपये टिहरी तलाव परिसर विकासासाठी आणि सणसणीत १४०० कोटी रुपये डेहराडून या राजधानीच्या शहराचे रूपांतर ‘स्मार्ट सिटी’त करण्यासाठी आहेत. आज हे आणि असे अनेक प्रकल्प, खर्च शब्दश: पाण्यात गेले आहेत.
ही आकडेवारी अशासाठी समजून घ्यायची की त्यामुळे आपली विकासनामक संकल्पना किती कालबाह्य झालेली आहे हे लक्षात यावे म्हणून. उत्तराखंड, हिमाचल, सिक्कीम आदी अनेक राज्ये पहाडी आहेत आणि समतल प्रदेशातील विकासांचे आराखडे या प्रदेशात राबवणे निसर्गतत्त्वांस सोडचिठ्ठी देणारे आहे. भव्य रस्ते, त्यासाठी डोंगरकपात, जलविद्युत प्रकल्पांसाठी धरण उभारणी त्यासाठी पुन्हा डोंगरकपात आणि भौगोलिकदृष्ट्या अस्थिर प्रदेशात जमिनीवरील भार वाढेल असे प्रकल्प हे आपण शहाणपणास किती मागे सोडले हे दाखवून देणारे आहे. श्रद्धाळू हिंदूंसाठी अत्यंत पवित्र चारधाम यात्रा याच परिसरात होते. ती अधिक सुखकर व्हावी म्हणून अनेक प्रकल्पांची घोषणा झाली. पण प्रत्यक्षात गेल्या काही वर्षांत या चारधाम यात्रेवर किती संकटे आली याची मोजदाद यानिमित्ताने व्हायला हरकत नाही. तेव्हा खरेतर निसर्ग वा पर्यावरण रक्षणासाठी नाही तरी निदान चारधाम यात्रेच्या हमीसाठी तरी या परिसराच्या निसर्गसंवर्धनाचा विचार आपल्याकडे व्हायला हवा. पण त्यापासून आपण कित्येक योजने कसे दूर आहोत हे गेल्या काही दिवसांतील हाहाकाराने दाखवून दिले आहे. सिक्कीम, दार्जिलिंग, कॉलिंपाँग परिसर, उत्तराखंड आणि त्याच वेळी किनारपट्टीवरील केरळ या तीन प्रदेशांनी पावसाचे हे भयकारी रूप अनुभवले. निसर्गाच्या बदलत्या चक्रास मानवाच्या बेताल आणि बेजबाबदार वर्तनाची जोड मिळाल्यास काय काय होऊ शकते, याची ही केवळ चुणूक म्हणायला हवी. कारण वातावरण बदलामुळे आगामी काळात यापेक्षाही अधिक उग्र घटना घडतील असा शास्त्रज्ञांचा होरा आहे.
म्हणून मग बदाबदा कोसळणारा पाऊस धरणे/रस्ते वा घरांसाठी कापलेल्या डोंगरकड्यांवरची माती सहज खाली ढकलून देऊ शकतो आणि त्या मातीस जमिनीशी बांधून ठेवायला झाडांची मुळेही नसल्याने भूस्खलन नियमित होत राहते. सुरुवातीच्या परिच्छेदात यासंदर्भात दिलेली आकडेवारी भयचकित करणारी आहे. इतक्या महाप्रचंड प्रमाणावर वृक्षतोड होत असेल आणि त्या बदल्यात मानवनिर्मित जंगलाची वाढ एक टक्क्यानेही होत नसेल तर सध्याच्या या संहारास जबाबदार निसर्ग किती आणि त्यात आपला वाटा किती हा प्रश्न पडायला हवा. अशाच प्रकारचा विध्वंस गेली काही वर्षे आपला पश्चिम घाट परिसर अनुभवत आहे. तेव्हा याही परिसरात निसर्गाचा असाच हैदोस सुरू असेल तर त्यात आश्चर्य ते काय? पाऊसपाणी हे शहाण्या विद्याथ्र्याप्रमाणे सर्व नियम पाळत होते, तोपर्यंत आपली अरेरावी खपून गेली. आता निसर्गही आपले अरेरावी ढंग दाखवू लागला आहे. कोणत्याही प्रदेशात तो सरासरीपेक्षा १० हजार पट अधिक कोसळत असेल तर त्या परिसरात हाहाकार झाल्याखेरीज राहणार नाही. अशा वेळी इतका पाऊस पडत असताना डोंगरदऱ्या बेफामपणे कापल्या गेल्या नसत्या, इतकी वृक्षतोड झालेली नसती, रस्त्यांसाठी कोणतीही शास्त्रीय पाहणी न करता कडे तासले गेले नसते, नको त्या ठिकाणी धरणे उभारली नसती तर इतका विध्वंस होता ना.
उत्तरेत याच्या जोडीला आणखी एक गंभीर संकट उभे ठाकले आहे. ते म्हणजे हिमवर्षावाचे आकसणे आणि त्याच वेळी पावसाचे अतिरिक्त प्रसरण होणे. गेल्या ५० वर्षांत हिमाच्छादित शिखरांची ‘उंची’ वाढू लागली आहे. म्हणजे बर्फाळलेले प्रदेश अधिकाधिक वरवर जाऊ लागले आहेत. यामुळे इतके दिवस या परिसरात ४८०० मीटर्सवर असलेली हिमरेषा आता ५२०० मीटरपेक्षाही वर सरकू लागली आहे. यामागील कारण उघड आहे. ते म्हणजे या परिसराचे वाढते उष्णतामान. सरासरी ०.५ ते ०.६ अंशांनी या परिसरातील तापमान वाढ झाल्याने आकडेवारीवरून दिसते. म्हणजे इतक्या प्रमाणात हिमखंडांचे वितळणे ओघाने आलेच. एका बाजूने भयंकर गतीने पाऊस कोसळणार आणि दुसरीकडे त्याच वेळी बर्फ वितळणार असे होणार असेल तर हे पाणी जाऊन जाऊन जाणार कोठे? ‘माणसाच्या नाकातोंडात’ हे यावरचे उत्तर असले तरी केवळ तेवढ्यावर आपली सुटका होणारी नाही. हे सर्व असेच सुरू राहिले तर हा निसर्ग परिसराचाच घास घेणार हे उघड आहे. उत्तराखंड, सिक्कीम, केरळ त्याआधी कोकण आदी परिसरांतील प्रलयंकारी पाऊस याचीच चुणूक दाखवतो.
त्यानंतरही आपले डोळे उघडणार नसतील तर आपणाइतके करंटे आपणच. हा केवळ निसर्ग-निर्मित, मानव-पुरस्कृत संकटांचा मुद्दा नाही. यामुळे आपले सारे जीवनचक्रच पुढील काही वर्षांत बदलणार आहे. त्या बदलास सामोरे जाण्याची आपली तयारी आहे का, हा यामागील महत्त्वाचा प्रश्न. पीकपाण्यात बदल करण्यापासून ते कृषी हंगामाच्या वेळापत्रकापर्यंत अनेक आघाड्यांवर आपणास तातडीने बदल करावे लागणार आहेत. हे एका रात्रीतच काय पण एका वर्षातही होणारे नाही. पीकपाण्याच्या सवयीतील बदल करण्यात एक पिढी खर्च होते. आपण त्यासाठी सुरुवातही अद्याप केलेली नाही. म्हणजे पहिले पाऊलच टाकले गेले नसल्याने गंतव्यस्थानी कधी पोहोचणार याची चर्चाही निरर्थक ठरते. हा मुद्दा पुरेशा गांभीर्याने घेत जीवनशैलीतील आणि सरकारी धोरणातील आवश्यक बदलास आपण कधी सुरुवात करणार या प्रश्नाच्या उत्तराची प्रतीक्षा कायम राहील. तोपर्यंत ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी’ म्हणत निसर्गपूजनात वगैरे आनंद, समाधान मानण्याचा पर्याय आहेच.
The post वृक्षवल्ली सोयरी वगैरे… appeared first on Loksatta.