संगणकाच्या कृत्रिम प्रज्ञेचा वापर कुणा खेळाडूंनी केल्याने जगज्जेत्या बुद्धिबळपटूंनाही मात खावी लागली, या ताज्या उदाहरणातून निर्माण होणारे प्रश्न नैतिकतेचे आहेत…
एकीकडे संगणकीय गुन्हेगारीची उदाहरणे, तर दुसरीकडे प्रत्यक्ष समाजात वाढलेली दाखवेगिरी याचा दोष केवळ संगणकीय तंत्राचा अर्थातच नाही. इथे मुद्दा आहे तो समाजजीवनाचा…
संगणकाने आणि माणसांना एकमेकांशी संवाद साधू देणाऱ्या आंतरजालाने मानवी जगणे सुसह््य केले, हे वाक्य आजवर कान किटेपर्यंत ऐकून झालेले आहे. जगणे सुकर झाले हे ठीक, पण अखेर संगणक आणि आंतरजाल ही साधने आहेत. ऑनलाइन किंवा डिजिटल माध्यमातून आणि आभासी व्यवहारांतून सारेच प्रश्न सुटतात असे मानणाऱ्यांसाठी आणि हे गृहीतक विनाचिकित्सा स्वीकारणाऱ्यांसाठी धोक्याच्या जागा भरपूर आहेत. साधे मोबाइल फोनमधील छायाचित्रांचे उदाहरण घ्या. अनेक मोबाइल फोनमधील छायाचित्रांमध्ये तुम्ही आहात त्यापेक्षा उजळ वर्णाचे दिसू शकता. किंवा चेहऱ्यावरील पुटकुळ्या, डाग वगैरे एका टिचकीनिशी तुम्ही या छायाचित्रातून अदृश्य करू शकता आणि चेहरा अधिकच सुंदर वगैरे दिसू लागतो. ही करामत संगणकीय- डिजिटल तंत्राची असते. हे निरुपद्रवी उदाहरण झाले. पण म्हणून सारेच प्रकार इतके साधे असतात असे नाही. माणूस जे बोललाच नाही, ते त्याच्या ओठांच्या- चेहऱ्याच्या हालचालींसह ध्वनिचित्रमुद्रणात ‘दाखवू’ शकणारे डीपफेक तंत्र अनेक खोट्या बातम्यांच्या उच्छादाचे कारण ठरू शकते. किंवा, आणखी एखादे संगणकीय तंत्रज्ञान खेळांच्या स्पर्धेतील गोडीच घालवून टाकू शकते. ते कसे? हे जाणून घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑनलाइन बुद्धिबळातील ताजे दाखले पाहाणे आवश्यक ठरते.
या खेळात सध्या ऑनलाइन स्पर्धांमध्ये चोरून संगणकीय गणकशक्तीचा वापर करून क्षमतेपेक्षा किती तरी अधिक उच्च दर्जाची कामगिरी करून बक्षिसे लुटण्याचे प्रकार उघडकीस येऊ लागले आहेत. या घडामोडी तशा अलीकडच्या, कोविडोत्तर काळातील. करोनामुळे लागू झालेल्या घोषित वा अघोषित टाळेबंदीची कवाडे खुली होणारा पहिला खेळ म्हणजे बुद्धिबळच. पण बहुसंख्य स्पर्धा युरोपमध्ये, तेथे करोनाची पहिली तीव्र लाट सुरू झाली. तशात हवाई प्रवासावर निर्बंध आल्यामुळे ऑनलाइन स्पर्धांचा मार्ग निघाला. सोयीचा आणि काही प्रमाणात धनलाभ देणारा. फरक इतकाच की, केवळ अत्युच्च मानांकित आणि वलयांकित बुद्धिबळपटूंप्रमाणेच हौशी बुद्धिबळपटूही जगभर विविध स्पर्धांतून खेळू लागले. बऱ्याचदा एखाद्या उच्च मानांकित खेळाडूला हौशी खेळाडूबरोबरही खेळावे लागे. इथवर ठीक होते. पण अनेकदा हौशी खेळाडूंकडून ऑनलाइन स्पर्धांमध्ये अनपेक्षितरीत्या बडे-बडे पराभूत होऊ लागले. या खेळात रेटिंग किंवा मानांकनाचे महत्त्व अनन्यसाधारण. या मानांकनात काही वेळा ६०० हून अधिक अंकांची तफावत असूनही एखादा अनाम खेळाडू ऑनलाइन स्पर्धा गाजवू लागला नि त्यातून संघटक आणि विश्लेषकांमध्ये संशय बळावला. आणखी एक मुद्दा. आधुनिक बुद्धिबळामध्ये शक्तिशाली प्रणालींचा वापर हल्ली चैनीचा नव्हे, तर गरजेचा झाला आहे. पण अशी प्रणाली एखाद्याच्या हाती खरोखरच असेल, तर अशी व्यक्ती आणि साक्षात बुद्धिबळ जगज्जेता यांच्या क्षमतेतील तफावत जवळपास संपुष्टात येते. जगातील अव्वल २०-३० अव्वल मानांकित बुद्धिबळपटू हल्ली जेव्हा ऑनलाइन स्पर्धा खेळतात, त्या वेळी विविध कोनांमध्ये त्यांच्यावर रोखलेले कॅमेरे तसेच इतर तत्सम प्रतिबंधात्मक उपायांमुळे ऑनलाइन लबाडीचे प्रकार जवळपास शून्य होतात. इतर स्पर्धांमध्ये मात्र अशी हमी देता येत नाही किंवा संघटकांकडेच प्रतिबंधात्मक उपाय योजण्यासाठी पुरेसा निधी नसतो. इंडोनेशियात अशाच एका ऑनलाइन ‘भामट्या’ बुद्धिबळपटूची लबाडी उघडकीस आली. युक्रेनमध्ये ऑनलाइन विद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धेत युक्रेनच्या राष्ट्रीय विजेत्या महिला बुद्धिबळपटूला खेळादरम्यान संगणक प्रणालीची मदत घेत असल्याचे आढळल्यामुळे बाद ठरवले गेले.
याविषयी बुद्धिबळपटू प्रवीण ठिपसे यांच्या मुलाखतीवर आधारित वृत्त ‘लोकसत्ता’च्या शुक्रवारच्या अंकात आहे. यातील उघडकीस आलेले प्रकार म्हणजे हिमनगाचे टोक असल्याचे सार्वत्रिक मानले जाते. ऑनलाइन माध्यम म्हणजे काळवंडलेल्या करोनायुगावरील अक्सीर इलाज असे बुद्धिबळविश्वातही मानले जायचे. त्याचे दुष्परिणाम दिसू लागल्यानंतर मात्र या समजुतीला धक्के बसू लागल्याचे दिसून येते.
पण हे धक्के केवळ बुद्धिबळापुरते नाहीत. ते गुन्हेगारी, कायदा आणि न्याय या क्षेत्रांतही बसू शकतात. अलीकडेच अमेरिकेतील एका खासगी गुप्तचर संस्थेच्या प्रमुखाने, दुसऱ्या व्यक्तीच्या आणि दूरस्थ संगणकामधील त्या व्यक्तीचे खासगी विरोपखाते- ईमेल अकाऊंट- ‘हॅक’ करून त्या व्यक्तीस न आलेले विरोपसंदेश त्यात पेरता येतात, असे म्हटले होते. त्या विधानाने आपल्याकडे, पुण्यात कथित शहरी नक्षलवादी म्हणून पकडले गेलेल्यांच्या विरोपातही तशी गडबड केली गेली नसावी काय, अशा संशयास जागा उत्पन्न झाली आणि त्याचा प्रतिवादही झाला. मुद्दा एवढाच की, संगणकीय तंत्रज्ञानाचा वापर फसवणुकीच्या हेतूने, दुसऱ्याच्या नकळत करण्याची प्रवृत्ती अनैतिकच नव्हे तर गुन्हेगारी स्वरूपाची असू शकते. हॅकिंगचे तंत्र आर्थिक गुन्ह््यांसाठी वापरले गेल्याची उदाहरणे अनेक आहेतच. बुद्धिबळ स्पर्धा जिंकण्यासाठी गुपचूप संगणकीय कृत्रिम प्रज्ञेचा वापर करणे यामागची प्रवृत्तीही गुन्हेगारीसदृश ठरवता येईल. पण गुन्हेगारीच्या पलीकडले काही प्रश्न संगणकीय सुविधांमुळे आपल्यापुढे उभे राहिलेले आहेत. अगदी आपल्या घरोघरी दिसू लागले आहेत.
पलंगावर किंवा कोचावर आरामात लोळत ‘ऑनलाइन शाळे’त शिकणारी चौथी-पाचवीतली मुले पाहा. ती निरागस नाहीत, असे कोण म्हणेल? पण आभासी शाळेत स्वत: इतरांना न दिसता हवे तसे लोळण्याची सुविधा संगणकीय तंत्र त्यांना देते आणि मुले त्याचा वापरही यथेच्छ करतात. शाळेत शिस्तीने बसण्याची सक्ती इथे नाही, हे त्यांना माहीत असते. या उदाहरणातला प्रश्न हा शिस्त आणि सक्ती यांविषयीचा आहे. पण मोठ्या माणसांच्या जगात तर किमान नैतिकता पाळणे, प्रामाणिक असणे हेदेखील सक्तीशिवाय अशक्यच आहे की काय असा प्रश्न पडावा अशी कैक उदाहरणे सापडतील. आणि याचा दोष केवळ डिजिटल- संगणकीय तंत्रावर ढकलता येणार नाही.
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना गणकयंत्र वा कॅलक्युलेटरचा वापर करणे हे एके काळी वज्र्य असे. असा वापर अप्रामाणिक मानला जाई. आज परिस्थिती पालटली, कारण अभियांत्रिकीपुढील आव्हाने बदलली. पण क्रीडाजगताचे वा सामाजिक जीवनाचे तसे नाही. ‘फेक न्यूज’च्या, अवास्तवरीत्या सुंदर केलेल्या छायाचित्रांच्या जगाचे काय? तथ्यपूर्णता आणि त्यासाठी आवश्यक असणारी काहीएक किमान नैतिकता यांचे आभासी जगात काय होणार आहे? बुद्धिबळातील जगज्जेत्यांची जी फसगत झाली, तीच पुढल्या काळात अधिकाधिक फसवी तंत्रे आल्यामुळे नैतिकतेची अपेक्षा ठेवणाऱ्यांची होणार का? की, नैतिकता हे जगण्याचे मूल्य मानण्याचा काळच नवनव्या सुविधांमुळे इतिहासजमा होणार आणि संगणक आणि आंतरजालाच्या आभासी जगात, ‘आभासी नैतिकता’ पाळली तरी पुरे, असे म्हणत नैतिकतेचा आभासच बलवत्तर ठरणार?
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 10, 2021 12:06 am
Web Title: editorial on cheat in online chess competition abn 97
Copyright ©
2021 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.