विद्यार्थी पदवीचे असोत की दहावीचे, त्यांच्या (कथित) ज्ञानग्रहणाचे मूल्यमापन करावयाचे असेल तर प्रत्यक्ष परीक्षेस सामोरे जाण्यावाचून त्यांना अन्य पर्याय असता नये…
पालकच जर आता ‘परीक्षा नको’च्या सुरात सूर मिसळणार असतील तर शिक्षणक्षेत्रासमोरील अनेक आव्हानांत आता या अशा पालकांची भर पडेल…
आपल्या शालान्त पाल्यास परीक्षाच द्याव्या लागू नयेत म्हणून जिवाचा आटापिटा करणाऱ्या आजच्या पालकदर्शनाने अनेकांचे हृदय भरून येऊन शिक्षकांच्या हस्तस्पर्शाच्या स्मरणाने त्यातील काहींच्या पाठी सद्गदित झाल्या असतील. दहावीच्या परीक्षाच यंदा होऊ नयेत, झाल्याच तर ऑनलाइन व्हाव्यात, उत्तीर्णासाठी अत्यावश्यक गुण ३५ वरून २५ पर्यंत खाली आणावेत, तितकेही गुण नाही मिळाले एखाद्यास तर तरीही त्यास/तीस उत्तीर्ण करावे, परीक्षेसाठी असलेला अभ्यासक्रम निम्म्याने कमी करावा अशा अनेक मागण्या यंदा दहावीस असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी केल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने सोमवारच्या अंकात प्रसिद्ध केले. या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्याचे त्यातून दिसते. हे आंदोलन मात्र त्यांनी ऑनलाइन न करता ऑफलाइन केले आणि त्यास अर्थातच त्यांच्या सुविद्य पालकांचा पाठिंबा होता. करोना-साथीमुळे आपल्या या दहावीतील कुकुल्या पाल्यास परीक्षा देण्याच्या जीवघेण्या संकटास सामोरे जावे लागू नये अशी या पालकांची इच्छा. पण ती नोंदवण्यासाठी या मिसरूड फुटू लागलेल्या पाल्याने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास या पालकांची हरकत नाही. आपल्या पोटचा गोळा वा गोळी परीक्षा नको या मागणीसाठी समविचारी विद्यार्थी योद्ध्यांच्या खांद्यास खांदा भिडवून आंदोलन करीत असताना हा करोनाचा नतद्रष्ट विषाणू ‘टैमप्लीज’ म्हणून या आंदोलनकाळापुरता तेथून दूर होणार याची या दिव्य पालकांना खात्री असणार. म्हणजे आंदोलनासाठी आपले चिरंजीव वा चिरंजीवी रस्त्यावर उतरण्यात या महासत्ता होऊ घातलेल्या, ज्ञानाधिष्ठित समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या थोरथोर पालकांना काहीही धोका वाटत नाही. पण परीक्षेसाठी त्यास/तीस वर्गात जावे लागल्यास, प्रश्नपत्रिका पाहून हीव भरल्यास मात्र त्यास करोनाचा विषाणू दंश करेल अशी भीती या काळजीवाहू पालकांना वाटते. हे असे विद्यार्थी आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणारे पालक पाहून मन सुन्न झाल्याशिवाय राहात नाही.
या परीक्षा-नको विद्यार्थी-पालकांपुढे महाराष्ट्रातील विद्यापीठाचे उदाहरण असणार. काही महिन्यांपूर्वी अशा काही विद्यापीठांचे विद्यार्थी परीक्षा नको या मागणीसाठी असेच रस्त्यावर आले होते. त्यास त्या वेळी उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांचे समर्थन होते. पण त्या तुलनेत या शालान्त परीक्षांस सामोरे जाणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि त्यांचे पालक मात्र पदवीच्या विद्यार्थ्यांइतके भाग्यवान नाहीत. कारण शालेय शिक्षण खात्याच्या मंत्री वर्षा गायकवाड यांना विद्यार्थ्यांच्या परीक्षा व्हाव्यात आणि त्या प्रत्यक्ष पद्धतीने व्हाव्यात असे वाटते. हे असे धैर्य आणि विवेक दोन्हींचे दर्शन घडवणाऱ्या गायकवाड यांचे अभिनंदन करावे की त्यांच्याविषयी चिंता व्यक्त करावी असा प्रश्न पडतो. दहावीची परीक्षा, ती कितीही पोकळ वगैरे असली तरी तो विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. तो ओलांडला की कालचे शालेय हा उद्याचे महाविद्यालयीन कुमार/कुमारी होतात. येथून त्याच्या शैक्षणिक कारकीर्दीस खरी सुरुवात होते. शालेय शिक्षण हे चमच्याने भरवल्यासारखे असते असे मानले, तर महाविद्यालयीन शिक्षणास स्वत:च्या हाताने जेवण्याची उपमा द्यावी लागेल. त्यामुळे शालेय टप्पा पार पाडणारी, कुमार वयातून विद्यार्थी-विद्यार्थिनींना बाहेर काढणारी दहावीची परीक्षा ही त्यांच्या पुढील शैक्षणिक कारकीर्दीसाठी अत्यंत महत्त्वाची असते. तशी ती असण्याचे आपल्याकडे आणखी एक कारण आहे.
ते म्हणजे नववीपर्यंतच्या शैक्षणिक परिस्थितीची बोंब. स्पर्धेच्या भावनेतून विद्यार्थ्यांची मने दुखावली जाऊ नयेत म्हणून आठवीपर्यंत परीक्षा माफ करण्याचा उच्च दर्जाचा बिनडोक निर्णय आपल्याकडे अमलात आल्यापासून शिक्षणाचे अधिकच तीनतेरा वाजले आहेत. त्यात आता शिक्षणाची, शिकवण्याची काठिण्यपातळी कमी करा असा आग्रह पालकच धरताना दिसतात. या अशा अवस्थेत खरे तर शालेय विद्यार्थी फार फार तर अक्षर परिचित होऊ शकतो. सुशिक्षित नाही. पण याचा कोणालाही ना खेद ना खंत. त्यामुळे अशा निर्बुद्धतेत फोफावलेल्या आणि सोकावलेल्या वर्गास दहावीच्याही परीक्षा नकोत असे वाटू लागले यात आश्चर्य नाही. एखादी व्यक्ती बौद्धिकतेची किती उंची गाठेल याबाबत प्रश्न निर्माण होतील. पण निर्बुद्धतेस तळ नसतो. या सत्याच्या उदाहरणाची भरघोस पिके आसपास आनंदात डोलताना सहज दिसतील. त्यात आता दहावीची परीक्षा नको अशी मागणी करणाऱ्यांचा नवा बहर.
ही परीक्षा नको का? तर वर्षभर शाळा प्रत्यक्ष भरवल्या न गेल्याने परीक्षाही अप्रत्यक्षच असाव्यात असे यांचे म्हणणे. म्हणजे ऑनलाइन शिक्षणाची परीक्षा ऑफलाइन का, असा त्यांचा प्रश्न. आभास आणि वास्तव यात जे अंतर तोच ऑनलाइन आणि ऑफलाइन यांतील फरक. वैद्यकाच्या विद्यार्थ्यांना मानवी देहाचा परिचय ऑनलाइन पद्धतीने करून देता येईल, वा आयुर्वेद शिकणाऱ्यांना नाडी परीक्षा कशी करावी यावर ऑनलाइन शिक्षण होईल. पण प्रत्यक्ष उपचार वा नाडी परीक्षा ही ऑफलाइनच करावी लागेल. तद्वत या विद्यार्थ्यांच्या कथित ज्ञानग्रहणाचे मूल्यमापन करावयाचे असेल तर प्रत्यक्ष परीक्षेस सामोरे जाण्यावाचून त्यांना अन्य पर्याय असता नये. आणि दुसरे असे की आरोग्यदृष्ट्या अत्यंत सुरक्षित वातावरणात परीक्षा घेता येऊ शकतात. तसेच उत्तरपत्रिका लिहीत असताना मुखपट्टी काढावी लागेल असेही नाही. म्हणजे मग या विद्यार्थ्यांना भीती नक्की कशाची? कदाचित असे तर नाही की करोनामुळे एकमेकांतील अंतर वाढवावे लागणार असल्याने एकट्याच्या जिवावर उत्तरपत्रिका लिहिणे या विद्यार्थ्यांना अधिक अवघड वाटते? म्हणजे एकमेकांच्या सहकार्याने उत्तरपत्रिका सोडवून अवघ्यांनी सुपंथ धरण्याची शक्यता यामुळे कमी होते.
पण असे विद्यार्थी संख्येने थोडे असतील. त्यांच्यामुळे प्रामाणिक अभ्यास करून परीक्षेत उत्तम गुणांची मनीषा बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय का होऊ द्यावा? ज्या पालकांना करोनामुळे आपल्या कुलदीपक/ कुलदीपिकेने घराबाहेर पडून परीक्षा केंद्रावर जाण्याचे दु:साहस करू नये असे वाटते त्यांनी आपल्या पाल्यांस खुशाल घरात ठेवावे आणि त्यांच्या आयुष्यातील एखादे वर्ष वाया जाऊ द्यावे. आपल्या पोराबाळांची इतकी काळजी असणाऱ्यांना त्यांचे एखादे वर्ष वाया गेले म्हणून काही तितके दु:ख होणार नाही. यातील अनेक पालकांची मागणी अशी की अभ्यासक्रम कमी केला जावा आणि प्रात्यक्षिक परीक्षा नकोत. आधीच मुळात आपल्याकडे दहावीच्या उत्तीर्णांचा बौद्धिक दर्जा तो काय! त्यात मुदलात पातळ असलेला अभ्यासक्रम अधिक पातळ करायचा म्हणजे त्यात बौद्धिक स्निग्धांश काय राहणार?
वास्तविक गेले वर्ष घरात बसून काढल्यानंतर खऱ्या पालकांनी आपल्या पाल्यास खऱ्या स्पर्धेसाठी तयार करायला हवे. या वर्षात सर्व कुटुंब बराच काळ घरात असताना आपल्या पाल्याच्या शिक्षणाकडेही पालकांनी लक्ष दिलेच असेल. नसेल दिले तर त्यांनी घरात बसून मग केले काय आणि दिले असेल तर मग परीक्षेला घाबरायचे कारण काय हे प्रश्न. अशा वेळी खरे तर परीक्षेची टाळाटाळ करणाऱ्या आपल्या पोटच्या पोराचे कान उपटणे हे पालकांचे कर्तव्य. पण हे पालकच जर आता ‘परीक्षा नको’च्या सुरात सूर मिसळणार असतील तर शिक्षणक्षेत्रासमोरील अनेक आव्हानांत आता या अशा पालकांची भर पडेल. वातावरण, अभ्यासक्रम, शासक हे सर्व शिक्षणदुष्ट असताना त्यांच्या जोडीने पालकही तसे होणार असतील तर आजच्या विद्यार्थ्यांना या अशा पालकांपासून वाचवणे हे पहिले उद्दिष्ट ठेवावे लागेल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 23, 2021 12:04 am
Web Title: editorial on tenth exam abn 97
Next Stories
Copyright ©
2021 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.