जावेद अख्तर यांचे विधान या दुसऱ्या वास्तवास बळकटी आणते. त्यांच्या विधानाने हिंदू धर्माभिमानी तर चेकाळतीलच.
हिंदू धर्मीय राजसत्तेचे उद्दिष्ट इतिहासात तरी धर्मप्रसार हे नव्हते; या वास्तवाकडे न पाहणाऱ्या पुरोगाम्यांच्या पंक्तीत जावेद अख्तर यांनी बसण्याची गरज काय?
नेमस्त पण भारदस्त साप्ताहिक ‘द इकॉनॉमिस्ट’च्या मुखपृष्ठकथेचा ताजा विषय ‘द थ्रेट फ्रॉम द इल-लिबरल लेफ्ट’ अर्थात ‘असहिष्णु डाव्यांपासून धोका’ असा असावा आणि त्याच वेळी शायर जावेद अख्तर यांनी नवा वाद उकरून काढावा या योगायोगात मोठा अर्थ आहे. अफगाणिस्तान आणि तालिबानच्या पार्श्वभूमीवर पाहू गेल्यास तो शोधण्याची गरज निर्माण होते. अख्तरसाब हे सामाजिक जाणिवेचे शायर आहेत आणि धर्म या मुद्दय़ावर त्यांची भूमिका सुविख्यात आणि आदरणीयही आहे. आदरणीय अशासाठी की आपल्याकडे पुरोगाम्यांचा एक वर्ग नेहमी फक्त हिंदूंनाच उदारमतवादाचे धडे देत असतो. अन्य धर्मातील मागासांविषयी वा हिंदूंच्या अल्पसंख्याक लांगूलचालनाविषयी हे पुरोगामी नेहमीच बोटचेपी भूमिका घेत आले आहेत. या पोचट पुरोगाम्यांमुळे हिंदू आणि देशाचे जितके नुकसान झाले आहे त्याची तुलना प्रतिगाम्यांमुळे होत असलेल्या नुकसानीशीच व्हावी. जावेद अख्तर असे नाहीत. ते प्रसंगी इस्लाम धर्मीयांसही खडे बोल सुनावण्यास कमी करत नाहीत. त्यामुळे भारतातील अस्सल अ-धर्मवाद्याची जी अवस्था होते तीच त्यांच्या वाटय़ास आली आहे. म्हणजे स्वधर्मी नाकारतात आणि परधर्मी आपले म्हणत नाहीत. वास्तविक अस्सल निधर्मीवाद्यास असा सर्व धर्मीयांकडून नाकारले जाण्यापरता अन्य मोठा गौरव नाही. पण प्राप्त परिस्थितीत मुद्दा अस्सल वा कमअस्सलांचा निधर्मीवाद हा नाही. तसा तो असता तर चर्चेचा परीघ समाजसुधारकांपुरताच मर्यादित राहिला असता. ते नेहमीच संख्येने अल्प असतात. पण जावेद अख्तर यांचे विधान हा परीघ ओलांडून व्यापक आणि बहुसंख्य समाजाच्या भावनांस हात घालणारे असल्याने त्यावर भाष्य आवश्यक ठरते.
ते करताना हे सत्य स्वीकारायला हवे की अल्पसंख्य बुद्धिवाद्यांस कितीही पोटतिडिकीने वाटत असले तरी बहुसंख्यांचे धर्मविषयक ममत्व कमी होणारे नाही. हे सत्य कालातीत आहे. बहुसंख्यांचे जगणे धर्माने घालून दिलेल्या नीतिनियमांभोवतीच फिरत असते आणि नैतिकतेसाठी धर्माची मुळीच गरज नाही हे सांगणारे गोपाळ गणेश आगरकर यांस उपेक्षेने मारणारे त्यांचे धर्मबांधवच असतात. त्यांच्याआधी दोनअडीचशे वर्षे, पंधराव्या शतकात गॅलिलिओस मृत्यूकडे लोटणारी रोमन कॅथलिक धर्मसत्ताच होती आणि ख्रिस्ताविरोधात कारवाया केल्याच्या संशयावरून यहुदींविरोधात (ज्यू) ‘क्रुसेड’ आखणारेही तेच होते. याच्या जोडीने इस्लाम धर्माच्या स्थापनेपासूनच झालेला रक्तपात संपणे सोडाच, पण आजतागायत कमीही झालेला नाही. इस्लामचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या हाती धर्म आणि राजसत्ता दोन्हीची सूत्रे होती. त्यांच्यानंतरचे चार खलिफा हेदेखील धर्माबरोबर राज्यही हाताळत होते. ख्रिश्चन धर्माचे प्रमुख पोप यांच्या हातीदेखील सत्ताधिकार होता. म्हणजे त्या धर्मातही धर्म आणि राजसत्ता या दोन्हींचे नियंत्रण एकहाती होते. बौद्ध धर्मप्रसारास मोठी गती ज्याच्यामुळे मिळाली तो अशोक हा तर सम्राट होता. या सर्व इतिहासाचा अर्थ असा की या प्रमुख धर्माच्या प्रसारास राजसत्तेची सूत्रे हाती असणे हे निर्णायक ठरले.
हिंदू धर्माचे असे झालेले नाही. सध्या हिंदू धर्माभिमान्यांचा अतिरेक लक्षात घेऊनही एक बाब कोणत्याही प्रामाणिक निधर्मीवाद्यासही मान्य करावी लागेल. ती म्हणजे हिंदू धर्मीय राजसत्तेचे उद्दिष्ट इतिहासात तरी धर्मप्रसार हे नव्हते. हे वास्तव लक्षात घेतल्यास अलीकडे आधुनिक, सुशिक्षित हिंदूंच्या ठायी धर्मभावना जागरूक होण्यामागील (वा ती जागरूक करण्यात येत असलेल्या यशामागील) कारण समजणे सोपे जाईल. ते आहे पाकिस्तान. वास्तविक मुसलमान धर्मीयांस स्वतंत्र राष्ट्र द्या ही मागणी हिंदुत्ववादी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही केली होती हे सत्य असले तरी हिंदू धर्मीयांच्या मनात ‘त्यांनी’ (पक्षी: मुसलमान) स्वत:साठी देश मिळवला अशीच भावना आहे. एक तर इतिहासात आक्रमक परकीय मुसलमान सत्तांनी या भूमीवर अत्याचार केले आणि वर्तमानात ‘त्यांनी’ स्वत:स देश मिळवला याच नजरेतून स्वातंत्र्योत्तर राजकीय वास्तवाकडे पाहिले जाते. यात हिंदूंच्या धर्मभावना जागरूक करण्यात निर्णायक भूमिका ठरली ती स्वत:स सेक्युलर म्हणवून घेणाऱ्या राजकारणाची. अल्पसंख्याकांच्या धर्मभावना कुरवाळण्यातच या सेक्युलर पुरोगाम्यांनी धन्यता मानली. किंबहुना या पुरोगाम्यांची स्पर्धा होती ती अधिकाधिक अल्पसंख्याकांना आपण कसे आणि किती जिंकू शकतो यासाठी. परिणामी या देशातील बहुसंख्य हिंदू हा वर्तमानातही उपेक्षितच राहिला. इतिहासात आक्रमक, हिंसक परकीय मुसलमान सत्तांकडून तो मारला गेला आणि वर्तमानात स्वकीय आणि स्वधर्मी पुरोगाम्यांकडून तो उपेक्षिला गेला. सध्याचे राजकारण असमर्थनीय असले तरी ते या वास्तवाचा आविष्कार आहे. हे सत्य अमान्य करता येणारे नाही.
म्हणून जावेद अख्तर यांचे विधान अस्थायी आणि अनावश्यक ठरते. त्यांच्या विधानात किती तथ्य आहे अथवा नाही याची चिकित्सा न करताही त्याचे परिणाम धर्मवाद्यांनाच बळ देणारे आहेत हे नाकारता येणार नाही. कोणत्याही धर्मवाद्यांस स्वधर्मातील सुधारणेऐवजी परधर्मीयांविरोधात गदारोळ निर्माण करणे हे अधिक सोपे आणि अंतिमत: फलदायी असते. अख्तर यांच्या विधानाने नेमके हेच होताना दिसते. तूर्त प्रश्न तालिबान्यांचा होता आणि प्रतिक्रिया तेवढय़ापुरतीच मर्यादित राखण्यात शहाणपण होते. कसे ते याच विषयावर नसीरुद्दीन शहा यांच्या अत्यंत रास्त भाष्यातून समोर येते. तालिबानच्या सरशीत समाधान मानणाऱ्या भारतातील विचारशून्य स्वधर्मीयांचा चोख समाचार शहा घेतात. त्याचीच नेमकी गरज होती आणि आहे. सद्य:स्थितीत ‘भारतीय मुसलमान’ अशी काही वेगळी व्यवस्था नाही असे मानण्यास अनेक हिंदूंना आवडते. किंवा अशा अल्पविचारी स्वजनांस हे(च) आवडावे अशी चतुर मांडणी हिंदू धर्मीयांकडून केली जाते, हेही खरेच. सर्व मुसलमान (शेवटी) एकच असतात अशा प्रचारास आलेले हे यश आहे. हे जर सत्य असते तर सर्व इस्लाम धर्मीय देशांत शांतता नांदून त्यांची प्रगती होती. पण असे होऊ शकले नाही. धर्म ही संकल्पना सर्वास एकत्र बांधू शकते, हे किती असत्य आहे हे यातून दिसते.
पण त्याच वेळी धर्म ही संकल्पना समाजास किती विलग करू शकते हेदेखील यातून दिसून येते. जावेद अख्तर यांचे विधान या दुसऱ्या वास्तवास बळकटी आणते. त्यांच्या विधानाने हिंदू धर्माभिमानी तर चेकाळतीलच. पण ते विधान मुसलमानांसमोरील अडचणीही वाढवणारे ठरेल. आधीच विद्यमान सत्ताधीशांनी आपल्या देशातील या सुमारे १९-२० कोटी मुसलमानांस नगण्य ठरवले आहे. म्हणजे त्यांच्या मतपेटीतील मतांस शून्यवत केले आहे. त्यामुळे त्यांच्या मतांची गरज सत्ताधीशांस नाही आणि विरोधकांनी त्यासाठी काही केल्यास लांगूलचालनाचा आरोप होण्याचा धोका. अशा टोकाच्या तीव्र धार्मिक वातावरणात अल्पसंख्य हे सत्तासंतुलनाच्या शोधात असताना अख्तर यांच्यासारख्यांच्या विधानामुळे ते साधणे अधिकच अवघड होऊन बसते. या विधानामुळे हिंदू धर्मातिरेक्यांस साप सोडून धोपटण्यासाठी नवी भुई मिळेल आणि मुसलमानांचा पैस अधिकच आकसेल. मूठभर बुद्धिवंतांच्या वाक्चातुर्याने संपूर्ण समाज लगेच बदलत नाही, हे कटू असले तरी सत्य आहे. या बदलासाठी वास्तवात प्रामाणिक प्रयत्नांची दीर्घकाल गरज असते. आधीच अशा प्रामाणिक प्रयत्नांचा आपल्याकडे दुष्काळ. त्यात अख्तर यांच्यासारखे अनावश्यक विधाने करून त्या चिमूटभर प्रयत्नांवर पाणी ओतणार.
अख्तर हे चित्रपटगीतांसाठी ओळखले जात असले तरी एक तरक्की-पसंद शायर म्हणून ते अधिक उत्कट आहेत. या प्रसंगी त्यांनी आपलीच ‘अभी कुछ दिन लगेंगे’ ही गजल पुन्हा एकदा याद करावी..
‘अंधेरे ढल गए रौशन हुए मंज्मर ज्ममीं जागी फ़लक जागा तो जैसे जाग उट्ठी ज्मिंदगानी।
मगर कुछ याद-ए-माज्मी ओढम् के सोए हुए लोगों को लगता है जगाने में अभी कुछ दिन लगेंगे॥’
इतिहासाचे पांघरूण घेऊन झोपलेल्यांस जागे करण्यासाठी आणखी काही दिवस लागतील, या त्यांनीच मांडलेल्या सत्याचे स्मरण त्यांनाच करून देण्याचा हा क्षण.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.