देश स्वतंत्र होताना अनेक माणसे नुसती पाहात बसली होती, अशा अर्थाचे वक्तव्यही गोखले करतात.
याच ‘पारतंत्र्या’च्या काळात विक्रम गोखले यांना राष्ट्रीय पुरस्कार आणि संगीत नाटक अकादमीचा गौरव प्राप्त झाला. या पारतंत्र्यातील गौरवाचे ते काय करणार?
या देशातील नाही तरी किमान महाराष्ट्रातील यच्चयावत पुरोगामी, विद्वान, संपादक, कलाकार इत्यादी इत्यादी यापुढील काळात कंगना राणावत हिच्या ऋणात राहतील. कारण एकच. तिने आपल्या पंगतीत ज्येष्ठ इत्यादी अभिनेते विक्रम चंद्रकांत गोखले यांस यशस्वीपणे ओढले म्हणून. मा. विक्रम गोखले यांच्या अभिनयेतर (खरे तर अलीकडे अभिनयाबाबतही) गुणांविषयी अनेकांच्या मनात शंका होतीच. खासगी गप्पा आदीत गोखले यांच्या समव्यावसायिकांकडून मिळणाऱ्या माहितीतून त्या शंकेचा आकार वाढूही लागला होता. पण खात्री पटेल असे काही घडत नव्हते. ती बहुप्रतीक्षित खात्री विदुषी कंगना हिने दिली. मराठी सांस्कृतिक विश्व तिचे ऋणी राहील ते यासाठी. ही खात्री पटवताना श्रीमान गोखले यांनी आपल्या बुद्धिमत्तेचे जे काही दर्शन घडवले त्याबाबत इतिहासाचे य:कश्चित विद्यार्थी म्हणून बरेच प्रश्न पडतात. ते विचारण्याचे औद्धत्य करण्याआधी ‘लोकसत्ता’च्या व्यासपीठावर घडलेला प्रसंग या निमित्त सर्वास सांगणे हे कर्तव्य ठरते. तो वाचून गोखले यांचे सहानुभूतीदार वा समविचारींस आताच हा प्रसंग सांगण्याची गरज काय वगैरे प्रश्न पडतीलच. त्याचे उत्तर असे की या प्रसंगानंतर तरी श्रीमान गोखले आपली झाकली मूठ उघडली जाणार नाही, याची खबरदारी घेतील अशी आशा ‘लोकसत्ता’स आणि त्या समारंभास हजर असलेल्या अन्यांस होती. कंगनाच्या सुरात सूर मिसळून गोखले यांनी ती धुळीस मिळवली. तेव्हा ताज्या इतिहासातील हा प्रसंग सर्वापासून दूर ठेवण्यात काही अर्थ नाही.
झाले ते असे की ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या सेवाभावी उपक्रमांत जमा झालेले धनादेश संबंधित संस्थांहाती सुपूर्द करण्याच्या २०१५ सालच्या कार्यक्रमात (दि. २४ नोव्हेंबर, स्थळ: सावरकर सभागृह, दादर) गोखले यांनी आपल्या विद्वत्ता सादरीकरणाची संधी साधली. आणि अभिनयातील कसदारपणाचे अस्थानी प्रदर्शन घडवत देशातील वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे आदींची मालकी प्रत्यक्षात परदेशी धर्मसंस्थांहाती कशी आहे असे धादांत असत्य मांडण्यास सुरुवात केली. खाणाखुणा करूनही गोखले यांच्या ज्ञानाचा धबधबा काही थांबेना. तेव्हा गोखले यांस ध्वनिक्षेपकावरून रोखण्याची वेळ आली. ‘तुम्ही मांडता आहात ते व्हॉट्सपविद्यापीठीय प्रचारसत्य आहे. सत्य नाही. आणि हे असले प्रचारकी असत्य पसरवण्याचा हा प्रसंग आणि स्थळ नव्हे’ अशी जाणीव त्यांस करून द्यावी लागली होती. सर्वासमोर घडलेल्या या प्रसंगातून धडा घेऊन तरी गोखले यांनी आपल्या ज्ञानलालसेस रास्त दिशा दिली असती तर कंगना राणावत हिची तळी उचलण्याची वेळ आली नसती. तेवढा विवेक गोखले यांस दाखवता आला नाही. तेव्हा त्यांना याबाबत काही प्रश्न विचारणे हे माध्यमकर्मी या नात्याने कर्तव्य ठरते.
पहिला मुद्दा स्वातंत्र्याचा. विदुषी कंगना हीस ते १९४७ साली नव्हे तर २०१४ साली मिळाले, असे भले वाटत असेल. या अभिनेत्रीच्या अलौकिक प्रतिभेची झेप पाहता तिच्या वाटेस जाणे म्हणजे आपल्या अंगावर कर्दमकण उडवून घेण्याची खात्री. त्यामुळे तिचे एक सोडून देऊ. गोखले यांनाही तसेच वाटणे हे दखलपात्र. गोखले यांचे वडील चंद्रकांत हे आपल्या सात्त्विक दानशूरतेसाठी आदरणीय होते. दरवर्षी विशिष्ट रक्कम ते सैनिककल्याणार्थ देत. पण त्यांच्या चिरंजीवांचे विधान त्या पुण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करते. कारण २०१४ सालापर्यंत देश स्वतंत्रच नव्हता तर तोपर्यंत कै. चंद्रकांत गोखले यांनी दिलेल्या देणग्या मातृभूमीच्या सेवेस आल्याच नाहीत, असे म्हणावे लागेल. म्हणजे त्यांचा हा पैसा काय ब्रिटिश साम्राज्याकडेच गेला? हे खरे असेल तर विक्रम गोखले यांनी वडिलांचे पांग फेडण्यासाठी ‘हा पैसा परत द्या’ असा तगादा ब्रिटिश राणीकडे किंवा गेलाबाजार प्रिन्स चार्ल्स यांच्याकडे तरी लावायला हवा. चंद्रकांत गोखले अलीकडेच, २००८ साली निवर्तले. म्हणजे त्यांना स्वतंत्र भारत पाहायलाच मिळाला नाही, असा त्यांच्या चिरंजीवांच्या प्रतिपादनाचा अर्थ. दुसरे असे की गोखले स्वत:स सावरकरवादी मानतात. स्वातंत्र्यवीरांनी देशासाठी खाल्लेल्या खस्ता सर्वच जाणतात. पण त्या क्लेशांचा देश स्वतंत्र होण्यास काहीच उपयोग झाला नाही, असा निष्कर्ष त्यांच्या ताज्या प्रतिपादनातून निघतो. तो त्यांस मान्य आहे काय?
देश स्वतंत्र होताना अनेक माणसे नुसती पाहात बसली होती, अशा अर्थाचे वक्तव्यही गोखले करतात. म्हणजे स्वातंत्र्य लढय़ात त्यांचा सहभाग नव्हता, असा त्याचा अर्थ. हे त्यांचे विधान मात्र खरे आहे. फक्त या अशा ‘पाहात बसलेल्या’ व्यक्ती आणि संघटना कोणत्या हे त्यांना माहीत नाहीत काय? काही संघटनांनी तर १५ ऑगस्ट १९४७ च्या मुहूर्तावर आपल्या कार्यालयावर तिरंगा फडकावणेही नाकारले. ते कोण हे गोखले जाणतात काय? तो इतिहास जाणून घेतल्यावर आपल्या वैचारिकतेतील दोष मान्य करून तीत सुधारणा करण्याचा प्रामाणिकपणा ते दाखवतील काय? तिसरा मुद्दा महागाईचा. ती काय मोदींमुळे आहे काय, हा त्यांचा प्रश्न खराच. पण २०१४ सालाआधीच्या महागाईसही तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग जबाबदार नव्हते असे म्हणण्याचा उदारपणा ते दाखवतील काय? तशी संधी आहे. कारण २०१४ सालचा प्रचार ज्या महालेखापाल विनोद राय आणि त्यांच्या दूरसंचार भ्रष्टाचार आरोपावर उभा होता त्या राय यांनीच अलीकडे बेताल आरोपांबद्दल माफी मागितली. गोखले यांनीही तसे काही करण्याचा विचार करण्यास हरकत नाही.
आपल्या प्रतिपादनात गोखले यांनी विख्यात दक्षिणी अभिनेता कमल हासन याच्यावरही तोंडसुख घेतले. त्यांच्या मते हासन हा ‘बेअक्कल’ आहे ! ठीक. त्याची अक्कल काढताना आपण त्याच्या एक-दोन चित्रपटांत काम केल्याचे गोखले नमूद करतात. त्याच सुरात हासन यांनी ‘पुन्हा बोलावले तरी आपण जाणार नाही’, अशी प्रतिज्ञा गोखलेंनी केली असती तर बाणेदारपणास जरा टोक आले असते. मुद्दा हासन यांच्या अकलेचा. प्रादेशिक भाषेत काम करूनही राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जाण्याची कामगिरी दक्षिणेतील कमल हासन, रजनीकांत आदींनी करून दाखवली. विक्रम गोखले यांस यातील किती जमले? गोखले ८० वर्षांचे तर कमल हासन ६७. उत्तम अभिनेत्यासाठी आवश्यक असलेली शरीरयष्टी वयाच्या सत्तरीतही हासन राखू शकले याचे कौतुक नाही करायचे म्हटले तरी एक बाब प्रकर्षांने समोर येते. ती म्हणजे हासन यांचा पद्मश्री, पद्मभूषण वगैरे खेरीज किमान चार वेळा चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरव झालेला आहे. काही महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय पुरस्कारही त्यांच्या वाटय़ास आले आहेत. ही सर्व त्यांच्या ‘बेअक्कल’पणाचीच कमाई! अर्थात हे सर्व पुरस्कार त्यांना २०१४ सालच्या आधी, म्हणजे कंगनामते देश स्वतंत्र होण्याआधीच मिळालेले आहेत. म्हणजे त्याचे तसे काहीच महत्त्व नाही. पण याच ‘पारतंत्र्या’च्या काळात विक्रम गोखले यांना एकमेव राष्ट्रीय पुरस्कार आणि संगीत नाटक अकादमीचा गौरव प्राप्त झाला. आता या पारतंत्र्यातील गौरवाचे गोखले काय करणार हा प्रश्नच की! जाता जाता कमल हासन यांच्याबाबत आणखी एक मुद्दा. तो म्हणजे आपली राजकीय मते रेटण्यासाठी स्वतंत्र राजकीय पक्ष काढण्याची हिंमत त्यांनी दाखवली. अन्य कोणाच्या पडद्याआडून राजकीय संधिसाधूपणाची चोरवाट त्यांनी स्वीकारली नाही. ‘बेअक्कल’ हासनपेक्षा निश्चितच बुद्धिमान गोखले या आघाडीवरही अधिक काही करून दाखवतील ही आशा. पण तोपर्यंत तरी त्यांनी स्वत:चे विचार मांडण्याचा प्रयत्न करावा. व्हॉट्सअॅप विद्यापीठ, त्यातील ज्ञानकणांवर पोसलेल्यांचे प्रतिनिधित्व करणारी अभिनेत्री कंगना वगैरेंच्या मतांची री ओढण्यात विक्रम गोखले यांनी धन्यता मानू नये. या विदुषी कंगनाच्या नावावर आधीच अनेक विक्रम आहेत. त्यात आणखी एकाची भर कशास?
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.