देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या महाराष्ट्राची आजची ही अवस्था का झाली आणि कोणी केली, यापेक्षाही महाराष्ट्राने ती होऊ दिली हे अधिक गंभीर..
ही घटना १९७२ मधली. तिला संदर्भ आहे तत्कालीन भीषण दुष्काळाचा. सरकारच्या परीने दुष्काळ निर्मूलनाची कामे सुरू होती. पण विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका सुरू होती. अशा वेळी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी काय करावे? दुष्काळग्रस्त भागाच्या तसेच दुष्काळग्रस्तांसाठी चाललेल्या कामाच्या पाहणी दौऱ्याला जाताना त्यांनी थेट विरोधकांनाच आपल्याबरोबर घेतले आणि सरकार काय करते आहे ते प्रत्यक्ष जागेवर नेऊन दाखवले. आज महाराष्ट्राच्या राजकीय परिप्रेक्ष्यात जो कर्कश गदारोळ सुरू आहे, त्याच्या पार्श्वभूमीवर हे उदाहरण अगदीच वेगळे चित्र दाखवणारे, खरे म्हणजे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती दाखवणारे. ते एकमेवाद्वितीय नाही आणि अपवाददेखील नाही, ही वस्तुस्थिती असली तरी एके काळी इथली राजकीय अशी संस्कृती होती, (आता नाही) असे म्हणावे की काय अशी वेळ सध्याच्या काळात आलेली आहे. सभ्य, सुसंस्कृत वागणे आणि सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांबद्दल संवेदनशीलता हा खरे तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्थायिभाव. यशवंतराव चव्हाण, सीडी देशमुख, पंजाबराव देशमुख, एस. एस. जोशी, मृणाल गोरे, मधु दंडवते अशा नेत्यांनी महाराष्ट्राच्या राजकारण आणि समाजकारणाला अशा उंचीवर नेऊन ठेवले की, ‘महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले’ या सेनापती बापटांच्या ओळी सार्थ ठराव्यात. महाराष्ट्राकडे असलेले देशाचे पुढारपण अधोरेखित करणाऱ्या या ओळी. ते पुढारपण आज गेले कुठे, असा प्रश्न पडण्याची वेळी आज आली असताना, असे पुढारपण आले कुठून याचाही शोध घ्यावा लागेल.
ते पुढारपण येण्याचे मूळ कारण शेकडो वर्षे या मातीत संतांनी केलेल्या सुविचारांच्या, सद्वर्तनाच्या शिंपणात शोधता येते. त्याची फळे किती वेगवेगळय़ा स्वरूपात दिसावीत.. सर्वसामान्य लोकांचे जीवनमानच बदलून टाकणाऱ्या कित्येक क्रांतिकारक योजना सगळय़ात आधी महाराष्ट्रात सुरू झाल्या आणि त्यापैकी अनेक योजना नंतर देशाने स्वीकारल्या. त्यातल्या निवडकांवर नजर टाकली तरी महाराष्ट्राचे पुढारपण अधोरेखित होते. स्त्रीशिक्षणाची सुरुवात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात केली आणि आज त्याचे परिणाम आपण पाहतोच आहोत. कोल्हापूर संस्थानात राजर्षी शाहू महाराजांनी १९०२ मध्ये मागास घटकांसाठी नोकऱ्यांमध्ये ५० टक्के आरक्षण दिले. पुढे तेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशपातळीवर नेले. १९७२च्या दुष्काळाच्या काळात महाराष्ट्रात ‘रोजगार हमी योजना’ या नावाने सुरू झालेली योजना आज ‘मनरेगा’ या नावाने देशभरात कष्टकऱ्यांच्या पोटाला आधार देते आहे. यशवंतराव चव्हाणांनी आर्थिकदृष्टय़ा मागास घटकांतील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या शिक्षण शुल्कातील सवलतीच्या योजनेचा कित्ता आज अनेक राज्यांमध्ये गिरवला जातो आहे. सहकारातून ग्रामीण विकासाचे सूत्र महाराष्ट्राने देशाला दिले. ७३व्या घटनादुरुस्तीमधून महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ टक्के आरक्षण देणारे महाराष्ट्र हेच पहिले राज्य आहे. आज देशभर ज्या स्वच्छता अभियानाचा बोलबाला सुरू आहे, त्याचीही मुळे महाराष्ट्रामधल्या दोन दशकांपूर्वीच्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानापर्यंत जातात. माहिती अधिकाराच्या कायद्याचा आग्रह धरणारे महाराष्ट्र हे देशामधले पहिले राज्य. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी ‘जादूटोणा विरोधी कायदा’ आणणारे महाराष्ट्र हेच देशामधले पहिले राज्य!
इतके मैलाचे दगड गेल्या एकसष्ट वर्षांत गाठण्यामागे इथल्या राजकीय नेतृत्वाचा वाटा नि:संशय आहे. इथे राजकीय चढउतार कैक झाले असतील, पण आपण राजकारण कशासाठी करतो आहोत आणि कुणासाठी करतो आहोत याचे भान कधी हरपले नाही. इथल्या राजकारणाला मतभेदांची किनार होती, ती असायलाच हवी. पण तिचे रूपांतर कधी टोकाच्या विद्वेषात झाले नाही. आचार्य अत्रे यांनी केलेली वाह्यात टीका मनावर घेऊन यशवंतराव चव्हाणांनी कधी सूडबुद्धीचे राजकारण केले नाही, की ‘बारामतीचा म्हमद्या’, ‘मैद्याचे पोते’ या शब्दांत शिवसेनाप्रमुखांनी केलेली शेलकी टीका कुणी मनावर घेतली नाही. अशा टीकेनंतरही वैयक्तिक मैत्री अबाधितच राहिली. शरद पवार यांच्यावर ‘२८५ भूखंडांचं श्रीखंड’ अशी टीका केल्यानंतरही दुसऱ्या दिवशी मृणाल गोरे- प. बा. सामंत शरद पवारांना सहजपणे भेटायला जाऊ शकले आणि मृणालताई आजारी पडल्यावर त्यांच्या शेवटच्या दिवसांत पवारही त्यांना आवर्जून भेटून आले. बारामतीत जाऊन शरद पवार यांच्यावर टीकेचे भाषण करणारे बापूसाहेब काळदाते रात्रीच्या मुक्कामाला तितक्याच सहजपणे पवारांच्या घरी आले. काँग्रेसचे विलासराव देशमुख आणि भाजपचे गोपीनाथ मुंडे राजकीय मैदानात खंदे विरोधक पण वैयक्तिक पातळीवर त्यांची महाविद्यालयीन जीवनापासूनची मैत्री. परस्परांचे मेहुणे असलेले शरद पवार आणि एन. डी. पाटील यांची राजकीय विचारसरणी आणि कार्यपद्धतीही भिन्न. आपल्या लाखालाखांच्या राजकीय सभांमधून भल्याभल्यांवर टीका करणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे वैयक्तिक पातळीवर मात्र त्यांचे मित्र असत. राजकारणासाठी पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला विरोध करणाऱ्या ठाकरेंच्या पंगतीला त्या संघाचा कप्तान जावेद मियांदाद हजेरी लावू शकत असे.
मतभेद, मतभिन्नता म्हणजे वैर नव्हे, विरोध म्हणजे विद्वेष नाही आणि राजकारण म्हणजे सूड नाही, याची जाणीव या मंडळींनी कायमच बाळगली. त्यामुळे त्यांचे राजकारण आणि त्यांचे मैत्र या दोन्ही गोष्टी वेगवेगळय़ा राहिल्या. सत्ता गेली म्हणून कुणी कुणाचा विद्वेष केला नाही की कुठली तरी जुनी प्रकरणे काढून कुणाला तुरुंगाची वाट दाखवली नाही. कारण ती महाराष्ट्राची संस्कृतीच नाही. आज मात्र कुणी उठतो आणि कुणावर वैयक्तिक टिप्पणी करतो. कुणी उठतो आणि कुणाला ईडीची भीती घालतो. कुणी उठतो आणि कुणाला संपवण्याची भाषा करतो. लोककारणासाठी राजकारणाचा मार्ग धरणारे इथले राजकारणी आज कुणा बनियांनी आखून दिलेल्या वाटेवर चालू लागले आहेत. राज्याची रचनात्मक राजकारणाकडून विध्वंसात्मक राजकारणाकडे वेगाने सुरू असलेली वाटचाल फक्त राजकारणाचाच स्तर खालावणारी नाही तर एकूणच राज्याच्या प्रगतीला खीळ घालणारी आहे. लोकशाही राजकारणात सत्तेची आकांक्षा असण्यात गैर काहीच नाही, पण त्या आकांक्षेचे रूपांतर अतिमहत्त्वाकांक्षेत होते तेव्हा काय होते, त्याचे चित्र सध्या दिसते आहे. राजकारण्यांमधले संबंध राजकीय न राहता ते विद्वेषाच्या पातळीवर पोहोचतात तेव्हा त्याचा परिणाम केंद्र-राज्य संबंधांवर होताना दिसतो. राज्याचा जीएसटीचा परतावा मिळत नाही, यापेक्षा हनुमान चालीसा महत्त्वाची ठरते. इतके दिवस जिचे अस्तित्वही कधी जाणवले नाही, त्या ईडीची शिडी सतत आधाराला लागते. राज्यातील सनदी अधिकाऱ्यांना अचानक केंद्राचाच हुकूम शिरसावंद्य होऊ लागतो. राज्याशी त्यांचे काही देणेघेणे उरत नाही. केंद्रीय नेत्यांच्या सभासभांतून, ‘डबल इंजिन’ नसेल तर तुमची गाडी भरकटणार, असे अलिखित संदेश लोकांना जाऊ लागतात.
उद्याच्या महाराष्ट्रदिनी राज्य म्हणून विचार करता महाराष्ट्राचे हे सध्याचे चित्र अत्यंत वेदनादायी आणि निराशाजनक आहे. देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या महाराष्ट्राची आजची ही अवस्था का झाली आहे आणि कोणी केली, यापेक्षाही महाराष्ट्राने ती होऊ दिली आहे, हे अधिक गंभीर आहे. मागास असणाऱ्याची प्रगती होणे हे खचितच कौतुकाचे असते, पण पुढारलेल्याची अधोगती होणे हे काही शहाणपणाचे नाही. तो महाराष्ट्रधर्म तर नक्कीच नाही!