आपल्यातील मर्यादांची जाणीव होऊ न देता आणि बलस्थानांची टिमकी न वाजवता कला सादर करण्यात कलाकाराचे मोठेपण दडलेले असते. श्रीकांत मोघे यांचे हे असे मोठेपण सतत दिसले..
अगदी अलीकडेपर्यंत मराठी पुरुषीपणाच्या (पुरुषत्वाच्या नव्हे) मानदंडाची काही दृश्य सांस्कृतिक प्रतीके होती. अनागर, रांगडे, पण सत्शील मराठी पुरुषीपण अभिनेते चंद्रकांत-सूर्यकांत यांच्यात पाहिले गेले. ती त्यांची मक्तेदारी. पण त्याच वेळी पुरुषीपणाच्या नागर, सुसंस्कृत आणि तितक्याच सत्शील प्रतीकांसाठी मात्र स्पर्धा होती. टापटीपप्रेमी, नीटनेटक्या मराठी जनांचे प्रतीक अरुण सरनाईक यांच्यात पाहिले गेले. विसरभोळा, गबाळा, खुशालचेंडू तरुण मराठी जनांनी स्वच्छंदी सतीश दुभाषी यांच्यात पाहिला. मध्यमवर्गास पेलेल आणि झेपेल अशा बंडखोर आणि त्यातल्या त्यात तडफदारांचे प्रतीक म्हणजे ‘..आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’. आणि यापलीकडे सुसंस्कृत घरातील विश्वास टाकावा असा काका, मामा वाटावा, महिलांनी तरुणपणी पती(च) होऊ शकेल असा प्रियकर आणि नंतर आदर्श दीर वा भाऊ ज्यांत पाहिला अशा मराठी मर्यादापुरुषोत्तमाचे रूप म्हणजे श्रीकांत मोघे. अत्यंत समृद्ध आणि मराठी समाजालाही श्रीमंत करणारे आयुष्य साजरे करून वयाच्या ९१ व्या वर्षी मोघे निवर्तले. त्यांच्या निधनाने कशी पोकळी निर्माण झाली वगैरे साचेबद्ध प्रतिक्रिया येतीलच. पण त्यापलीकडे श्रीकांत मोघे यांच्या जाण्याने आपण काय गमावले याचा हिशेब मांडला जायला हवा.
तसे केल्यास श्रीकांत मोघे यांच्या निधनाने मराठी सांस्कृतिक जगतातून कशाकशाची वजाबाकी करावी लागेल, याचा अंदाज येऊन एक खिन्नता दाटून येईल. श्रीकांत आणि सुधीर या मोघे बंधूंकडून शिकावे असे बरेच काही. त्यांतील आवर्जून लक्षात घ्यावी अशी एकच एक बाब कोणती असेल तर ती म्हणजे स्वत:च्या आवडत्या क्षेत्रांवर आयुष्यभर प्रेम कसे करावे, ही. धाकटे सुधीर कवी होते. ‘शब्दांच्या आकाशात शब्दांचे मेघ फिरावे’ अशा सहजकवी सुधीर यांना आयुष्यभर ‘कविता पानोपानी’ फुटत होत्या. त्यांच्याइतकेच शब्द/संगीत आणि त्यांचे सुरेल सादरीकरण यांत थोरले श्रीकांत आकंठ बुडालेले होते. ही दोन्ही कीर्तनकाराची मुले. अर्वाचीन मराठी संस्कृतीच्या श्रीमंतीत या हरदासी परंपरेचा फार मोठा वाटा आहे. हा कीर्तनकार प्रबोधनकार तर असतोच, पण त्याच वेळी तो गायक असतो, नर्तक असतो आणि समोरच्या बायाबापडय़ा, तरुणांना एकाच वेळी बांधून ठेवू शकेल असा अभिनेता तर तो असावाच लागतो. श्रीकांत मोघे हे असे सर्व एकाच वेळी होते. या साऱ्याची जाण असेल तर त्या व्यक्तीच्या चालण्याबोलण्यात आपोआपच एक प्रकारची लयबद्धता येते. मोघे यांच्या प्रत्येक भूमिकेत ती दिसते. म्हणून त्यांच्या एकाही भूमिकेतील एकही हालचाल असममित (असिमेट्रिकल) आढळणार नाही. अभिनय कलेच्या शास्त्रशुद्ध शिक्षणातून हे साध्य होत असेलही. पण श्रीकांत मोघे यांच्यात हे कौशल्य अंगभूत होते. त्यास त्यांनी आपल्या अनुभवातून आणि शब्दसुरांच्या प्रेमातून अधिक धारदार केले. याच्या प्रचीतीसाठी त्यांच्या दोन भूमिकांचा आवर्जून उल्लेख करावाच लागेल.
‘लेकुरें उदंड जालीं’ आणि पुलंच्या ‘वाऱ्यावरची वरात’मधील ‘रविवारची सकाळ’. ‘लेकुरें’त श्रीकांत मोघे ‘राजशेखर’ होते आणि ‘रविवारची सकाळ’मध्ये कडवेकरमामा. दोन्ही भूमिकांत संगीत हा त्या व्यक्तिरेखांचा अविभाज्य भाग होता. यात मोघे यांचे वैशिष्टय़ असे की, त्यांनी गाण्याचा अभिनय नाही केला. ते गायले. लौकिकार्थाने ते बैठकीचे गायक नव्हते. पण सुरांचे आणि शब्दांचे पक्के भान असल्याने गायकाइतक्याच उत्कटेने त्यांचे संपूर्ण शरीर गात असे. यातील ‘लेकुरें’च्या संगीताचा बाज वेगळा आणि ‘रविवारची सकाळ’मधील संगीत वेगळे. तुलना करणे अयोग्य, पण तरीही या दोहोंत ‘लेकुरें’च्या संगीतातील उडतेपणा लक्षात घेता, ते सादरीकरणात अधिक सोपे होते. ‘रविवारची सकाळ’ मात्र तशी नव्हती. एक तर त्यात हार्मोनियमवर साक्षात पुलं होते, तबला लालजी देसाई वाजवत आणि त्यात गायचे होते. त्यातील पद म्हणाल तर थेट अब्दुल करीम खाँसाहेबांनी लोकप्रिय करून ठेवलेले ‘उगीच का कांता’. ते सादर करता करता श्रीकांत मोघे त्यात ज्या बेमालूमपणे ‘कर्नाटकी ढंग’ आणत, ते खऱ्या गायकाइतके थक्क करणारे होते. याच्या बरोब्बर वेगळा ढंग त्यांचा असे ‘वाऱ्यावरची वरात’मध्ये. त्यात ‘दिल देके देखो, मुझे पिलाओ एक कप कोको’ असे तद्दन आचरट गाणे गात गात ते ‘ग्यानबा तुकाराम’च्या ठेक्यात घुसत, ते पाहणे हा एक अनुभव असे. ‘सहज जिंकी मना’, ‘सुंदर मी होणार’, ‘अंमलदार’, ‘सीमेवरून परत जा’, ‘अशी पाखरे येती’ वगैरे अनेक उत्तमोत्तम नाटकांतील त्यांच्या भूमिकाही तितक्याच आनंददायी होत्या.
पण गाजल्या आणि अविस्मरणीय ठरल्या त्या वर उल्लेखलेल्या व्यक्तिमत्त्वाशी सुसंगत अशा. उदाहरणार्थ ‘गारंबीचा बापू’ त्यांनीही केला. पण मनात घर करून राहिला तो काशिनाथ घाणेकरांचा बापू. कपाळावरच्या केसांची एखादी बट झुलवत मस्तवालपणे उंडारणारा घाणेकरांचा बापू हा मोघेंपेक्षा अधिक खरा वाटतो. मोघेंचा बापू उगाच ‘राधे’च्या वाटेस जाईल हे मनास पटत नाही. तीच बाब तेंडुलकरांच्या ‘अशी पाखरे येती’तल्या ‘अरुण’ची. ही भूमिकाही लोकांच्या अधिक लक्षात राहिली ती अरुण सरनाईक यांची. पण पुलंच्या ‘तुझे आहे तुजपाशी’तल्या डॉ. सतीश, राजेश आणि श्याम या तीनही भूमिका मोघे यांनी वेळोवेळी साकारल्या. त्या तीनही तितक्याच संस्मरणीय ठरल्या. त्यांचा सतीश वा श्याम जितका नैसर्गिक वाटतो, तितका नंतर कोणाचाही वाटला नाही. ही अशी नैसर्गिकता हे मोघे यांचे बलस्थान होते. आणि तीच त्यांची मर्यादाही होती.
कोणत्याही कलाकाराचे वैशिष्टय़ त्याच्यातील मर्यादांमुळेच अधोरेखित होत असते. त्या ओळखून आपला रस्ता जे निवडतात आणि त्या निवडलेल्या रस्त्यावरून आत्मविश्वासाने मार्गक्रमण करतात ते मोठे ठरतात. मोघे यांचे मोठेपण यात आहे. खरे तर आपली बलस्थाने फुटकळ कलाकारही ओळखून असतो. पण असे फुटकळ कलाकार आणि मोघे यांच्यासारखे यांतील फरक असा की, यांतील पहिले आपल्या बलस्थानांवरच खेळत बसतात. त्यामुळे त्यांच्या सादरीकरणाची तबकडी हुकमी टाळ्यांच्या जागी अडकलेली असते. श्रीकांत मोघे यांचे कधीही असे झाले नाही. आपल्यातील मर्यादांची जाणीव प्रेक्षकांना होऊ न देता आणि बलस्थानांची टिमकी न वाजवता आपली कला सादर करण्यात कलाकाराचे मोठेपण दडलेले असते. मोघे यांचे हे असे मोठेपण सतत समोर येत राहते.
अशा कलाकारांकडून नकळतपणे असा सममितीचा (सिमेट्री) आनंद रसिकांपर्यंत झिरपत राहतो. श्रीकांत मोघे यांनी तो आयुष्यभर दिला. त्यात वैयक्तिक पातळीवर खंड पडू लागला तो फक्त त्यांच्या वयाच्या शेवटच्या टप्प्यात. गुडघ्याच्या व्याधीने त्यांची ही सममिती भंगली. त्यास इलाज नव्हता. पण तरीही त्यांच्या वाणीने वेदनेवर नेहमीच मात केली, आपला सममित कलाकार अखेपर्यंत अबाधित राखला. आता या सगळ्यातून ते मुक्त झाले. मराठी सांस्कृतिक विश्वातील या सममित कलाकारास ‘लोकसत्ता’ परिवाराची आदरांजली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 8, 2021 12:01 am
Web Title: special editorial on srikant moghe abn 97
Copyright ©
2021 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.